प्रशांत चंदनखेडे वणी
गावाला सोडून देण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाला दुचाकीवर बसून नेत त्याच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल लुटणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शोध पथकाने अटक केली. वणी मुकुटबन मार्गावर १० जानेवारीला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. गुन्हे शोध पथकाने शीघ्र तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. मो. जुबेर अब्दुल सलाम (३३) रा. मस्जिद जवळ खडबडा मोहल्ला, अशफाक उर्फ अय्या साहेब खान पठाण (२८) रा. गॅस गोदामाच्या मागे खडबडा मोहल्ला अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील एका थेरेपी केंद्रात थेरेपी करून किशोर रामचंद्र ठावरी (५१) रा. नवरगाव ता. वणी हे गावी जाण्याकरिता पायदळ बसस्थानकाकडे जात होते. एवढ्यात दोन दुचाकीस्वार त्यांच्या जवळ येऊन थांबले. या दुचाकीस्वारांनी त्यांना कुठे जात आहे, अशी विचारणा केली. त्यांनी नवरगाव या आपल्या गावी जात असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर या दोघांनी आम्हीही नवरगाव येथेच जात असल्याचे सांगून त्यांना गावी सोडून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसविले. वणी मुकुटबन मार्गाने दुचाकी नेतांना त्यांनी १८ नंबर रेल्वे पुलापासून मेंढोली मार्गाकडे दुचाकी वळविली. मेंढोली मार्गाने काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालकाने दुचाकी थांबवून किशोर ठावरी यांना मारहाण करीत त्यांच्या जवळील रोख ४ हजार ८०० रुपये व मोबाईल बळजबरी हिसकावून तेथून पळ काढला. भररस्त्यात दुचाकीस्वारांनी लुटल्याने भयभीत झालेल्या किशोर ठावरी यांनी नंतर पोलिस स्टेशनला येऊन रीतसर तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
या लुटपात प्रकरणाचा तपास नंतर गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आला. पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून शीघ्र तपासचक्रे फिरविली. मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पथकाने अवघ्या काही तासांतच दोन्ही लुटारूंना अटक केली. त्यांच्या जवळून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (MH २९ AB ४६८२) व १५०० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. उर्वरित रक्कम त्यांनी खर्च केल्याची कबुली दिली आहे. या दोनही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ही कार्यवाही ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्दर्शनात डीबी पथक प्रमुख एपीआय धीरज गुल्हाने व डीबी पथकाने केली.
No comments: