Latest News

Latest News
Loading...

शहरातील जत्रा मैदान परिसरात आढळले शेकडो गायींचे शीर व मांस, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील जत्रा मैदान परिसरात शेकडो गायींचे शीर व मांस आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. खुल्या जागेवर गोवंश जनावरांचे शीर व मांस पडून दिसल्याने जनभावना उफाळून आल्या आहेत. नंतर ही माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संघटनेचे शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी गोवंश जनावरांची कत्तल करून शीर व मांस उघड्यावर फेकणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच या घटनेचा कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेधही करण्यात आला. घटनास्थळी हजारोच्या संख्येने नागरिक जमा झाले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अशा प्रकारचं क्रूर कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व तेथे जमलेल्या नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. 

वणीतील जत्रा मैदान परिसरात (लालगुडा रोड) मांस विक्रीची दुकाने आहेत. शनिवार दिनांक 11 जानेवारीला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास या मार्गाने जाणे येणे करणाऱ्या काही तरुणांना चौपाटी बार समोर रस्त्याच्या कडेला दोन गायींचे शीर आढळून आले. हे तरुण या शिरासोबत सेल्फी घेत होते. तरुण गोवंश जनावरांच्या शिरासोबत सेल्फी घेत असल्याचे पाहून तेथे नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. मार्गाने जाणे येणे करणारे लोक त्याठिकाणी थांबले. 

नंतर काही वेळातच गोवंश जनावरांच्या शिरांचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. दरम्यान शिवसेना, बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना मिळताच एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. यावेळी घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. 

असा झाला पर्दाफाश... 

रस्त्यावर दोन गाईंचे शीर आढळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना तेथेच एका झोपडीत शेकडो गाईंचे शीर आढळून आले. गायीचे शीर विकले जात नाही. मात्र त्याची हाडे विकली जातात. अशी माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. त्यामुळे हे शीर एका झोपडीत साठवून ठेवल्याचा अंदाज बांधला जात आहे. 

या घटनेचा विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध केला जात आहे. श्रीराम नवमी उत्सव समितीचे रवी बेलूरकर यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गायींची कत्तल कुणी केली? कोण आहेत आरोपी? गोवंश हत्या कायदा राज्यात लागू असताना गायींचे शीर भर रस्त्यात फेकून पोलिसांपुढे आव्हान निर्माण करण्यात आल्याने याची शहरात जोरदार चर्चा होत आहे.

No comments:

Powered by Blogger.