प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिच्या उकनी कोळसाखान परिसरात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. कोळसाखान परिसरात वाघाचा वावर असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. कोळसाखान परिसर हा झाडाझुडपांनी वेढलेला असून याठिकाणी वन्य जीवांचं वास्तव्य असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कोळसाखान परिसरात काही महिन्यांपूर्वी वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पाळीव जनावरांची शिकार करतांनाच वाघाने लोकांवरही हल्ला चढवून एका मनुष्याच्या नरडीचा घोट घेतला होता. या वाघाला पकडण्याकरिता वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. परिसरात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्यात आले होते. रेस्क्यू पथक व शार्पशुटरही बोलावविण्यात आले होते. तेंव्हा कुठे या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र त्यानंतरही कोळसाखान परिसरात वाघाचे दर्शन होतंच होते. वेकोलिच्या उकनी, कोलारपिंपरी, पिंपळगाव व जुनाड कोळसाखानी लगत घनदाट झुडपी जंगल असल्याने याठिकाणी वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येते. वन्य जीवांच्या वास्तव्यास पूरक असलेल्या या परिसरात वन्य जीवांचे नेहमीच दर्शन होते. अशातच पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने कोळसाखान परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या मनात कमालीची धडकी भरली आहे.
उकनी कोळसाखान परिसरात एक पट्टेदार वाघ मुतावस्थेत आढळून आला. काही दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे. कुजलेल्या अवस्थेत वाघाचा सापळा आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कोळसाखाणीतील कर्मचाऱ्यांना वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. कर्मचाऱ्यांनी ही माहिती लगेच आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली. वाघ मृतावस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाला मिळताच वणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाचे मृत शरीर शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. मात्र उकनी कोळसाखान परिसरात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली आहे.
No comments: