मोटारसायकल अपघातात युवकाचा मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
मोटारसायकल अपघातात युवकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना नांदेपेरा गावाजवळ घडली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. आणि यातच त्याचा मृत्यू झाला. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. २४ जानेवारीला रात्री उशिरा या युवकाचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. २५ जानेवारीला पहाटे गावातील काही लोकांना दुचाकीसह हा युवक रस्त्याच्या कडेला पडून दिसल्यानंतर ही अपघाताची घटना उघडकीस आली. सचिन मधुकर मडावी वय अंदाजे ३८ वर्षे रा. वनोजादेवी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
मोटारसायकलने (MH ३४ AC ९४२४) वनोजादेवी या आपल्या गावाकडे जात असतांना मोटारसायकल अनियंत्रित होऊन सचिन मडावी हा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. रात्रीची वेळ असल्याने हा अपघातग्रस्त युवक कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. त्यामुळे त्याला कुणाचीही मदत न मिळाल्याने रात्रभर जखमी अवस्थेतच तो पडून राहिला. आणि यातच त्याचा मृत्यू झाला. असा कयास वर्तविण्यात येत आहे. सचिन मडावी हा एसटी महामंडळात नोकरीवर असल्याचे समजते. मात्र मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. २४ जानेवारीला काही कामानिमित्त तो मोटारसायकलने घराबाहेर पडला. मात्र गावी परततांना रात्री उशिरा नांदेपेरा गावाजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. आणि अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज २५ जानेवारीला पहाटे नांदेपेरा गावातील काही नागरिकांना सचिन मडावी हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून दिसला. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास जमादार अविनाश बनकर करीत आहे.
Comments
Post a Comment