Latest News

Latest News
Loading...

गोवंश हत्या प्रकरणी आरोपींवर वाढीव कलम लावण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरातील जत्रा मैदान परिसरात गोवंश जनावरांचे दोन शीर आढळल्याने हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. शहरात जातीय सलोखा नांदत असतांना अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या घटनेशी संबंधित सर्व आरोपींवर त्यानुषंगाने गुन्हे नोंद करून त्यांना अटक करण्याची  मागणी समस्त गौरक्षक हिंदू समाज बांधवांनी एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्याकडे लेखी अर्जातून केली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींच्या कलमांमध्ये वाढ करून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीला घेऊन गौरक्षक हिंदू समाज बांधवांनी पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देखील केले. 

शनिवार दि. ११ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास जत्रा मैदान रोडवरील एका बार जवळ गोवंश जनावरांचे दोन शीर आढळून आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जत्रा मैदान परिसरात अधिक शोध घेतला असता त्यांना गोमांस व एका टिनाच्या शेडमध्ये शेकडो गोवंश जनावरांचे मुंडके व हाडे आढळून आली. त्यानंतर त्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर वायरल होताच हजारो नागरिक घटनस्थळी जमा झाले. नागरिकांमधून या घटनेविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. घटनास्थळावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी जमावाला शांत करून प्रकरण उत्तमरीत्या हाताळले. त्यानंतर पोलिसांनी सर्व तपास यंत्रणा कामी लावून रात्रभऱ्यात आठ आरोपींना अटक केली. परंतु त्यांच्यावर सौम्य गुन्हे नोंद करण्यात आल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. 

आरोपींच्या या गुन्ह्यामुळे शहरातील जातीय सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झालेला असतांना त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य कलम लावल्या. आरोपींवर सौम्य कलम लावण्यात आल्याने न्यायालयानेही त्यांना जामिनावर सोडले. तेंव्हा या सर्व आरोपींवर व त्यांच्या मुख्य सूत्रधारांवर वाढीव कलम लावून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सर्व गौरक्षक हिंदू समाज बांधवांनी एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्याकडे लेखी अर्जातून केली आहे. तसेच या मागणीला घेऊन हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनही केले. आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवि बेलुरकर, तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, अजिंक्य शेंडे, राजू तुराणकर, कृणाल चोरडिया, राहुल पारखी श्रीकांत पोटदुखे यांच्यासह शेकडो हिंदू समाज बांधव उपस्थित होते. 


No comments:

Powered by Blogger.