प्रशांत चंदनखेडे वणी
शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शासकीय मालमत्तेची चोरी करण्याइतपत चोरट्यांच्या हिमती वाढल्या आहेत. नगर पालिकेच्या शाळेतील साहित्य चोरी केल्याची घटना ताजी असतांनाच चोरट्यांनी चक्क निर्गुडा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावर लावण्यात आलेले लोखंडी गेटच लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत जलसंधारण अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वणी घुग्गुस मार्गावरील वागदरा गावाजवळील पंडिले यांच्या शेताजवळ निर्गुडा नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे ७० किलो वजनाचे लोखंडी गेटच चोरट्यांनी लंपास केले. ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता गेट चोरीला गेल्याचे जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती आपल्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जलसंधारण अधिकारी सुमित राजेंद्र भागवत (३०) रा. जिजाऊ नगर वणी यांनी १० फेब्रुवारीला पोलिस स्टेशनला येऊन कोल्हापुरी बंधाऱ्यावर लावण्यात आलेले गेट (किंमत २८ हजार रुपये) चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: