मालवाहू वाहनाच्या ड्रॉवर मधून ९० हजार रुपये लंपास, सनी बार जवळ थांबविले वाहन आणि चोरट्याने दाखविली हात चलाखी
प्रशांत चंदनखेडे वणी
मालवाहू पिकअप वाहनाच्या ड्रॉवर मधून ९० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शहरातील दीपक टॉकीज परिसरात ८ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरपना तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी असलेल्या सचिन संजय देवतळे (२६) या शेतकऱ्याने वणी येथे कापूस विक्री करीता आणला होता. कापूस विक्री केल्यानंतर गावाकडे परत जातांना दीपक चौपाटी परिसरातील सनी बार जवळ त्याने वाहन थांबविले. अशातच त्याच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने मालवाहू वाहनात ठेऊन असलेल्या रोख रक्कमेवर हात साफ केला. दीपक चौपाटी परिसर हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा बनला आहे. बाहेरगाव वरून आलेल्या लोकांना ओळखून हे चोरटे हात चलाखी दाखवितात. शहरात कामानिमित्त किंवा फिरायला आलेले लोक दीपक चौपाटी परिसरात फिरकले की, चोरटे त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांच्या जवळील रोख रक्कम व किंमती वस्तूंवर हात साफ करतात. सचिन देवतळे हा शेतकरी देखील कापूस विक्री केल्यानंतर दीपक टॉकीज परिसरातील सनी बियरबार जवळ थांबला. त्याने कापूस विक्रीतून मिळालेले ९० हजार रुपये मालवाहू वाहनातच पेपरमध्ये गुंडाळून ठेवले. मात्र वाहनाच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन देवतळे यांने पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: