Latest News

Latest News
Loading...

शेतकऱ्याचे पैसे चोरणाऱ्या चोरट्याला २४ तासांत केली अटक, डीबी पथकाची कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी 

कापूस विक्रीतून शेतकऱ्याला मिळालेली रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांतच मुसक्या आवळल्या. वणीला मालवाहू वाहनातून कापूस आणल्यानंतर शेतकरी हा कापसाची विक्री करून गावी परतत असतांना काही वेळ त्याने दीपक चौपाटी परिसरात वाहन उभे केले. कापसाच्या चुकाऱ्यातून मिळालेली रोख रक्कम शेतकऱ्याने मालवाहू वाहनाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. चोरट्याने संधी साधून मालवाहू वाहनातून रोख रक्कम लंपास केली. वाहनातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. या चोरी प्रकरणाचा डीबी पथकाने अतिशीघ्र छडा लावून चोरट्याला अवघ्या २४ तासांत अटक केली.  

कोरपना तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवाशी असलेल्या सचिन संजय देवतळे या शेतकऱ्याने ९ फेब्रुवारीला वणी येथे कापूस विक्री करीता आणला होता. कापूस विक्री केल्यानंतर गावी परततांना दीपक टॉकीज परिसरातील सनी बार जवळ त्याने काही वेळ वाहन उभे केले. कापसाच्या चुकाऱ्यातून मिळालेले ९० हजार रुपये त्याने वाहनातच चालकाच्या बाजूला असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते. बार जवळ उभे असलेले वाहन व वाहनात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने कास्तकाराच्या रोख रक्कमेवर हात साफ केला. शेतकरी जेंव्हा वाहनाजवळ परतला तेंव्हा त्याला वाहनातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने तात्काळ पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविली. सचिन देवतळे या शेतकऱ्याची तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने शीघ्र तपासचक्रे फिरवून अवघ्या २४ तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. सागर अशोकराव घोसे (३३) रा. अलीपूर ता. हिंगणघाट जि. वर्धा असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी चोरीतील ९० हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (MH २९ CD ०३१७) असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख धीरज गुन्हाने व डीबी पथकाने केली. 

No comments:

Powered by Blogger.