Latest News

Latest News
Loading...

शहरात संत रविदास महाराज जयंती उत्सवाचे भव्य आयोजन, सुषमा अंधारे व चंद्रशेखर आझाद (रावण) खास आकर्षण

प्रशांत चंदनखेडे वणी 

राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी द्वारा शहरात संत रविदास महाराज जयंती सोहळा-२०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नगीना लोकसभा मतदार संघाचे (उत्तर प्रदेश) खासदार ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) व शाहू, फुले, आंबेडकरी विचारांच्या प्रखर विचारवंत सुषमा अंधारे हे या जयंती सोहळ्याचे खास आकर्षण राहणार आहेत. महापुरुषांच्या विचारांचा वारसा आपल्या विशिष्ट शैलीतील प्रबोधनातून पुढे नेत वैचारिक परिवर्तनाची लाट निर्माण करणाऱ्या या दोनही परखड विचारवंतांचे विचार या जयंती सोहळ्यात प्रत्येक्षात ऐकायला मिळणार आहेत. १४ व १५ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र येथे आयोजित या जयंती सोहळ्यात या दोनही प्रख्यात विचारवंतांना खास करून आमंत्रित करण्यात आलं आहे. 

१४ फेब्रुवारीला प्रबोधन पर्व पहिले या वैचारिक सत्रात सायंकाळी ४ वाजता शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार परखडपणे मांडणाऱ्या प्रख्यात विचारवंत सुषमा अंधारे यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतिभा धानोरकर राहतील. तर या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर, चर्मकार महासंघ महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरोज बिसुरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष मिना भागवतकर, धरणगाव नगर पालिकेच्या मा. नगराध्यक्ष अंजली विसावे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षा सुनिता लांडगे (महिला आघाडी), युवती आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षा प्रणोती बांगडे या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या या सत्रात चर्मकार समाजातील कर्तृत्वान महिला, शारीरिक अपंग महिला, विधवा महिला व ६० वर्षांवरील महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

१५ फेब्रुवारीला प्रबोधन पर्व दुसरे या वैचारिक सत्रात सायं. ४ वाजता आंबेडकरी विचारांची धगधगती तोफ म्हणून ओळखले जाणारे नगीना लोकसभा मतदार संघाचे (युपी) खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) यांचा देशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीवर आपल्या खास शैलीत वैचारिक प्रबोधनाची तोफ डागणारा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप राहणार असून कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देखमुख हे उपस्थित राहणार आहेत. तर वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ता रविंद्र राजूस्कर, चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सत्रात चर्मकार समाजातील कर्तृत्ववान पुरुष, शारीरिक अपंग पुरुष, उपेक्षित घटक व गटई कामगार तथा ६० वर्षांवरील पुरुषांचा सन्मान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता संत रविदास महाराज यांची शहरातील प्रमुख मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प्रबोधन व विविध सामाजिक उपक्रमांनी संत रविदास महाराज जयंती उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या जयंती उत्सवातील प्रबोधन व इतर सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र वणी व संत चर्मकार सुधार मंडळ वणी यांनी केले आहे. 

No comments:

Powered by Blogger.