Latest News

Latest News
Loading...

आत्महत्येचे सत्र सुरूच, मारेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

मारेगाव तालुक्यात एका पाठोपाठ दोन आत्महत्या झाल्याने तालुका हादरला आहे. केगाव येथील युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच नवरगाव (धरण ) येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. ११ फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आली. कपिल रविंद्र परचाके (२६) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 

हाताला मिळेल ती कामे करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या कपिलने नैराश्येतून आत्महत्या केली. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाने मृत्यूला कवटाळल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरी कुणी नसतांना त्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी कपिलचा मोठा भाऊ घरी परतल्यानंतर त्याला कपिल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच ही माहिती कुटुंबियांना दिली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

आत्महत्येची दुसरी घटना मारेगाव तालुक्यातीलच केगाव येथे घडली. युवा शेतकऱ्याने स्वतःवर असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. पवन अण्णाजी पिंपळशेंडे (३५) असे या विषाचा घोट घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवार दि. ११ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पवन हा शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. त्याच्याकडे ३ एकर शेती होती. अशातच नापिकीने त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. कर्जाच्या विवंचनेतुन त्याने विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला. कुटुंबाचा प्रमुख आधार असलेल्या पवनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.