"तू ज्ञानाचा पहाड भीमा, वाघाची दहाड भीमा," कडुबाई खरात यांच्या प्रबोधनपर गीतांच्या मैफिलीला उसळला जनसागर
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका व भीमकन्या कडुबाई खरात यांच्या प्रबोधनपर गीतांच्या रंगलेल्या मैफिलीला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. शासकीय मैदान प्रेक्षकांच्या गर्दीने फुललं होतं. भव्य मैदानावर उसळलेली गर्दी बाबासाहेबांच्या विचारांचं वादळ आजही जनमानसांत तेवढ्याच तिव्रतेने घोंगावत असल्याची साक्ष देत होती. कडुबाई खरात यांची बाबासाहेबांच्या संघर्ष व क्रांतीचा जागर करणारी गीते ऐकण्याकरिता शासकीय मैदानावर जनसमुदाय उमळला होता. भव्य शासकीय मैदान प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीमुळे छोटं वाटत होतं. कडुबाई खरात यांची महापुरुषांच्या जीवन संघर्षावर आधारित क्रांतिकारी गीतं ऐकण्याकरिता प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. कार्यक्रमाला उसळलेला जनसागर बघता कडुबाई खरात यांनीही एकापेक्षा एक सरस गीते गायली. मग प्रेक्षकही त्यांच्या गीतांवर मनसोक्त थिरकले. पुरुषांबरोबरच महिलांनाही थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. घटनाकाराने देशात घडविलेली क्रांती आणि जनतेच्या न्याय, हक्क, अधिकारांना दिलेली बळकटी यावर कडुबाई खरात यांनी जबरदस्त प्रबोधन करणारी गीते गायली. त्यांच्या प्रत्येक गीताला प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी द्वारा रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजकांनी हा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांच्या बैठकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कसल्याही प्रकारची धांदली होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण काळजी घेण्यात आली. ध्वनी प्रक्षेपणही दर्जेदार होते. कडुबाई खरात यांच्या प्रबोधनपर गीतांच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. कडूंबाई खरात यांनी पहाडी व सु-मधुर आवाजात गायलेल्या गीतांना प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले. तरुण व युवा पिढी महापुरुषांच्या कार्याची धुरा वाहणारी असल्याने त्यांची प्रबोधनाच्या कार्यक्रमांना उपस्थिती गरजेची असते. या कार्यक्रमाला तरुणाई देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. महिला, पुरुष व तरुणाईला कडुबाई खरात यांच्या गीतांवर थिरकण्याचा मोह आवारता आला नाही."तुम्ही खाता त्या भाकरीवर, माया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी, तू ज्ञानाचा पहाड भीमा, वाघाची दहाड भीमा, साऱ्या देशाचा बाप माया भीमराव पावरफुल, साऱ्या जगात कुठं भी जाय माझ्या भीमाचा दरारा हाय, भीम माझा गं दिल्लीत भाषण देई, आमचा मास्तर शिकवतो आज, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे" अशी एकापेक्षा एक सरस गीते गाऊन कडुबाई खरात यांनी प्रेक्षकांमध्ये जोश भरला. दरम्यान त्यांनी महापुरुषांच्या कार्याची महितीही सांगितली. कडुबाई खरात यांच्या प्रबोधनपर गीतांनी महापुरुषांच्या विचारांचं वादळ निर्माण केलं. आणि महापुरुषांच्या विचारांवर चालणारे तुफानातले दिवे आहेत, हे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही दाखवून दिलं. अन्यायावर पेटून उठणारा भीमाचा छावा आहे, आणि जो गप्पगार झाला तो चळवळीला बाधा आहे, हे कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमाला उसळलेल्या वैचारिक लाटेने परत एकादा सिद्ध केलं आहे.
Comments
Post a Comment