विवाहित युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल
वाहन चालक असलेल्या संदीप बंडू येरगुडे याचा गावातीलच मुलीबरोबर प्रेम विवाह झाला होता. सांसारिक जीवनात त्यांना नंतर एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य झाली. काही काळ सांसारिक जीवन सुरळीत चालल्यानंतर पती पत्नीमध्ये भांडणे वाढली. नेहमी त्यांच्यात वाद होऊ लागले. दोघांमध्ये वाद झाले की पत्नी सरळ माहेरी निघून जायची. ती मुलाबाळांचा देखील विचार करीत नव्हती. नंतर संदीप येरगुडे हा पत्नीला आणायला सासरी गेला की सासरची मंडळी त्याला शिवीगाळ करून मारहाण करायची. त्यामुळे त्याला अपमानित झाल्यासारखं वाटायचं. काही दिवसांनी (सन २०२०) संदीप येरगुडे हा पत्नीसह भेंडाळा येथे राहायला आला. त्यानंतरही दोघांमधील भांडणे कमी झाली नाही. काही ना काही कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण व्हायचा. अशातच २०२३ मध्ये संदीपची पत्नी परत त्याला सोडून माहेरी निघून गेली. त्यावेळी तो तिला आणायला गेला असता सासरच्या मंडळींनी त्याला शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. आणि त्याला आल्यापावली परत पाठविले. त्यामुळे तो प्रचंड तणावात आला.
याच दरम्यान त्याने सिंदूर ता. भद्रावती येथील शेती विकून गाडेगाव येथे शेती घेतली. मात्र त्याची पत्नी गाडेगाव येथे यायला तयार नव्हती. मुलं मोठी झाली होती. मुलगा ११ वर्षांचा तर मुलगी १५ वर्षांची झाली. त्यामुळे मुलांवर आपल्या भांडणाचे वाईट परिणाम होतील, असे तो पत्नीला समजावून सांगत होता. मात्र तरीही ती गाडेगावला न आल्याने संदीप हा आपल्या मुलांना घेऊन गाडेगावला राहायला गेला. २०२४ मध्ये संदीप हा आपल्या नातेवाईकांना घेऊन पत्नीला आणायला सासरी गेला असता पत्नीने त्याच्या सोबत येण्यास नकार दिला, व सासरच्या मंडळींनीही तिला पाठविण्यास असमंती दर्शविली. त्यामुळे मुलांचा सांभाळ करून संदीप हा विवंचनेत राहू लागला. त्यानंतर ७ फेब्रुवारीला त्याने सासरी फोन केला असता पत्नीच्या भावाने त्याला शिवीगाळ करून मारहान करण्याची धमकी दिली. त्यामुळे संदीपने तणावात येऊन वेडद येथील जंगलात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने सासरच्या मंडळींना मृत्यूस कारणीभूत ठरवले आहे.
त्यावरून मृतक संदीप येरगुडे याची बहीण योगिता मनोज भोयर रा. मारेगाव (मुकुटबन) हिने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी सासरे गजानन मारोती माथुलकर, साळा सुरज गजानन माथुलकर, अजय गजानन माथुलकर, सासू उषा गजानन माथुलकर चौघेही रा. सिंदूर ता. भद्रावती, साळी कविता श्रीकांत निखाडे, तिचा पती श्रीकांत निखाडे रा. येरुर ता. भद्रावती यांना संदीप येरगुडे याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरवून त्यांच्यावर बीएनएसच्या कलम १०८, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment