एक वर्षानंतर उलगडलं नामदेवच्या मृत्यू प्रकरणाचं रहस्य, नामदेवची आत्महत्या नसून खूनच, तीन आरोपी अटकेत
वणी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉ.) येथील वापर नसलेल्या पडक्या विहरीत एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. विहिरीत मृतावस्थेत आढळून आलेल्या या व्यक्तीच्या मृत्यूचं रहस्य जवळपास एक वर्षांनी उलगडलं आहे. या व्यक्तीने आत्महत्या केली नसून त्याचा गावातीलच तीन जणांनी संगमत करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सदर व्यक्तीचा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही आरोपींना अटक केली आहे. एका व्यक्तीच्या खुनात हात रंगलेल्या या तीनही आरोपींवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ मारोती शेनूरवार (३४), दिवाकर शंकर गाडेकर (२८), पिंटु उर्फ प्रविण वामन मेश्राम (३९) तिघेही रा. राजूर (कॉ.) असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना ११ फेब्रुवारीला अटक करण्यात आली.
राजूर (कॉ.) येथील रहिवाशी असलेल्या नामदेव पोचम्मा शेनूरवार (५०) याचा मागील वर्षी २५ मार्चला धुलीवंदनाच्या दिवशी कोळसा सायडिंग जवळ मस्जिद परिसरात असलेल्या एका पडक्या विहरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतक हा रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. तो आपल्या आई सोबत राहत होता. त्याची पत्नी व मुले त्याच्या पासून विभक्त राहायची. अशातच तो घरून बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याचा शोध सुरु असतांनाच एका पडक्या विहरीत त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्यावेळी त्याच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. नामदेव शेनूरवार हा आत्महत्या करू शकतो यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता, तसे कुटुंबियांचे देखील म्हणणे होते. परंतु तरीही नामदेव शेनूरवार याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा कयास वर्तवून त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला नाही.
मात्र नामदेव शेनूरवार याच्या मृत्यूला काही दिवस लोटत नाही तोच त्याच परिसरात राहणारे व त्याच्या नाते संबंधात असणारे व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आपणच त्याचा खून केल्याचे बरळत होते. एवढेच नाही तर ते मृतकाच्या बहिण व जावयासोबत विनाकारण वाद घालून त्यांच्या अंगावर चालून जात होते. त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत त्यांची दादागिरी वाढली होती. एकाला तर संपविलेच आता तुमचा नंबर आहे, अशी खुली धमकी देत ते स्वतःच आपल्या गुन्ह्याचा डंका पिटत होते. आरोपींच्या नेहमी वाद घालण्याने व खुल्या धमक्या देण्याने भयभीत झालेल्या मृतकाच्या कुटुंबीयांनी नंतर पोलिस स्टेशनला येऊन पोलिसांसमोर त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पाढाच वाचला. तसेच ते स्वतःच खून केल्याचे बरळत असून आम्हालाही संपविण्याची भाषा करीत असल्याची तक्रार मृतकाच्या बहिणीने पोलिस स्टेशनला नोंदविली होती.
मात्र त्यावेळी पोलिसांनी आरोपींची स्वतःच खून केल्याची गरड ओकणं गांभीर्याने घेतलं नाही. मात्र खांदेपालट होताच पोलिसांनी मृतदेह आढळल्याच्या जवळपास एक वर्षानंतर व कुटुंबीयांनी तक्रार केल्याच्या अंदाजे सहा ते सात महिन्यानंतर नामदेव शेनूरवार याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे. नामदेव शेनूरवार मृत्यू प्रकरणाची फाईल उकरून काढत पोलिसांनी नामदेव शेनूरवार याला मृत्यू पश्च्यात न्याय दिला आहे. नामदेव शेनूरवार याचे आरोपी सिद्धार्थ शेनूरवार याच्या आई सोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण सिद्धार्थला लागल्याने त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत नामदेवचा खून केला. नामदेव शेनूरवार याला आरोपींचे मनसुबे न कळल्याने तो बेसावध होता. अशातच आरोपींनी नपश्चात त्याचा गेम करून त्याची आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न केला. परंतु दारूच्या नशेत त्यांनी गरड ओकणे सुरु केले. आणि खुनाच्या या घटनेचा उलगडा झाला.
नामदेव शेनूरवार याच्या नात्यातच असलेल्या आरोपींनी कट रचून त्याला यमसदनी धाडले. परंतु गुन्हा कधी लपत नाही असे म्हणतात. आणि झालेलही तसेच, जवळपास एक वर्षानंतर नामदेवची हत्या करणारे सिद्धार्थ मारोती शेनूरवार, दिवाकर शंकर गाडेकर, पिंटू उर्फ प्रविण वामन मेश्राम हे तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे. नामदेव शेनूरवार याचा खून करून मृतदेह विहिरीत फेकणाऱ्या तीनही आरोपींवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला गुन्ह्याचा साक्षीदार बनविल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि निलेश अपसुंदे व पोलीस करीत आहे.
No comments: