संत रविदास महाराजांचा विचार एका हॉलमध्ये बसून बोलण्यापुरता सीमित नाही तर तो कृतीत आणला पाहिजे : सुषमा अंधारे

प्रशांत चंदनखेडे वणी 

मन चंगा तो कटोती मे गंगा हे बोलायला ठीक आहे, पण मानायला कुणी तयार नाही, कुणीही यावर अमल करायला तयार नाही. जोपर्यंत हे विचार कृतीत आणले जाणार नाही, तोपर्यंत वैचारिक चळवळीवर काम करता येणार नाही. संत रविदासांनी १५ व्या शतकात जे विचार मांडले. ते विचार बाबासाहेबांनी २० व्या शतकात राज्यघटना लिहितांना अधिकारात रूपांतरित केले. परंतु आपली अडचण हे होते की, आपण प्रतिकांमध्ये अडकलेली माणसं आहोत. आपण यावर अमल करायला तयार होत नाही. आम्ही प्रश्न विचारात नाही. आमचे आम्हाला प्रश्न पडत नाही. धाडसाने प्रश्न विचारणारा समुदाय तयार झाला पाहिजे. संत रविदासांचा विचार फक्त एका हॉलमध्ये बसून नुसताच बोलायचा एवढ्यापुरता सीमित होत नाही. तर त्यांनी मांडलेला प्रत्येक विचार अमलात आणतांना जर तसं घडत नसेल, आणि समाज व्यवस्थेत तेवढा सकारात्मक, सम्यक, सौरचनात्मक जर समग्र क्रांतीचा मार्ग गवसत नसेल, आणि तो बदल होत नसेल, तर इथल्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद, ती धमक आपल्या मंगटांमध्ये आली पाहिजे. माणसातील संवेदना जिवंत आहेत, हे दाखविण्याकरिता आपल्याला बोलावे लागेल, प्रश्न विचारावे लागतील. त्याकरिता आधी आपल्या डोक्यात प्रश्न निर्माण होणे सुरु झाले पाहिजे. आपले विचार आपण बदलले पाहिजे. विचार बदलतील तेंव्हाच देशात परिवर्तन घडेल, असे रोखठोक प्रतिपादन फुले, शाहू, आंबेडकर विचारवंत सुषमा अंधारे यांनी केले. त्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणीच्या वतीने आयोजित संत रविदास महाराज जयंती उत्सव प्रबोधन पर्व पहिले या कार्यक्रमात प्रमुख मार्गदशक म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर या होत्या.

सुषमा अंधारे पुढे बोलतांना म्हणाल्या की, आम्ही ऍक्शन प्लानवर कधीच काम करीत नाही. तर रिऍक्शनरी मुव्हमेंटवर काम करतो. आम्ही क्रियाशील नाही, तर प्रतिक्रियावादी आहोत. समाजातील एखाद्या घटकावर अत्याचार झाला की, आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करतो. आंदोलने, मोर्चे काढतो. ही आपली रिऍक्शनरी मुव्हमेंट आहे. पण अत्याचार घडूच नये याकरिता आपण काय केलं आहे. आणि ते करणं म्हणजेच संत रविदासांचे विचार आहेत. "जग बदल घालुनी घाव मला सांगून गेले भिमराव" असे अण्णाभाऊ साठे म्हणायचे. मात्र आता जग बदलायचे आहे, पण गोड बोलून हे जग बदलणार नाही. त्यासाठी आता भूमिका बदलावी लागणार आहे. जो चुकत असेल त्याला त्याची चूक दाखवून द्यावी लागणार आहे. आपल्या आदर्शांबद्दल जर कुणी अपमानजनक वक्तव्य करत असेल तर त्याला त्याची लायकी दाखवून द्यावी लागणार आहे. बाबासाहेब राज्यघटनेच्या पानापानात बुद्ध, शिवबा, शाहू, फुले, कबीर, रविदास यांचे विचार मांडतात. कदाचित यामुळेच येथील जातीवादी व्यवस्थेची जास्त मळमळ होते. कदाचित या व्यवस्थेचं यामुळेच जास्त पोट दुखायला लागतं. आणि म्हणूनच ते आपले आयकॉन मोडीत काढण्याचा डाव रचत आहेत. त्यांनी जातीचं गौडबंगाल याठिकाणी निर्माण केलं आहे. सर्वांना दोन हात दोन पाय व सर्वांची सारखी शरीर रचना असतांना जाती वरून माणसामाणसांत भेदभाव करण्याची परंपरा देशात खोलवर रुजविण्यात आली आहे. 

सर्वांचा जन्म मृत्यचा मार्ग एक असतांना मधात रॉंग नंबर डायल करणाऱ्याचा शोध घेण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि देशातली चातुरवर्ण्य व्यवस्थाच मोडीत काढली. बाबासाहेब मानवतेची चळवळ उभी करतात. माणसाने माणसाला माणसासारखे वागविले पाहिजे, ही मानवतेची शिकवण बाबासाहेब सांगतात. ते म्हणतात माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी. बाबासाहेब म्हणतात कुणासमोर झुकायचं नाही. तुमच्या पाठीला रबर नाही कणा आहे, त्यामुळे ताठ उभे रहा. आपण सर्व सारखेच आहोत, आणि हेच विचार संत तुकोबा, ज्ञानेश्वर व रविदासही सांगतात. संत रविदास आपल्या दोह्यात म्हणतात मै भी चामका, तूम भी चामके, सारा जग चामका, चामकी गाय, चामका बछडा. माणसांत काय वेगळं आहे, आपण सर्व मरते लोक आहोत, आपल्यात काहीही वेगळंपण नाही. एखाद्याच्या शरीरात असा काय वेगळा अवयव आहे की तो श्रेष्ठ ठरतो व एखाद्याला कोणता अवयव कमी आहे की, तो कनिष्ठ ठरतो. ज्यांनी कुणी आपापली मोनोपॉली (मक्तेदारी) राखण्यासाठी ही व्यवस्था उभी केली, त्यांची मोनोपॉली मोडीत काढण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि हेच विचार संत रविदास महाराजही आपल्या दोह्यातून सांगतात. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी अंटचेबल नावाचा ग्रंथ संत रविदास यांना अर्पित केला. 

संत परंपरा व गुरुशिष्यांची परंपरा आपल्या देशात रुजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं अष्टप्रधान मंडळ उभं केलं होतं. पण शिवाजी महाराजांच्या आधीही एका राजाकडेही अष्ट प्रधान व्यवस्था होती, ती होती सम्राट अशोकांकडे. सम्राट अशोकाची ती अष्टप्रधान व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे येते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं पाहिलं स्मारक शोधून काढतात ते महात्मा फुले. महात्मा फुले पाहिलं शिव स्मारक शोधतात, आणि पहिली शिव जयंती साजरी करतात. त्या क्रांतीबांना गुरुस्थानी मानतात ते बाबासाहेब. आणि बाबासाहेबांचे विचार लेखणीतून मांडतात ते अण्णाभाऊ साठे. संत रविदास महाराज रामानंद यांना आपले गुरु मानतात. तर संत मीराबाई या रविदासांना आपले गुरु मानतात. सांप्रद काळातील राजघराण्यातील महिला एका सर्वसामान्य कुटुंबातील शूद्र समजल्या जाणाऱ्या रविदासांना गुरु मानते. त्यामुळे संत मीराबाईचा चुकीचा इतिहास मांडला जातो. 

बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरु मानले. महात्मा फुले यांनी १८२७ साली चळवळ उभारली व शुद्रांसाठी पाण्याचा हौद खुला केला. तर बाबासाहेबांनी आपल्या गुरूच्या आदर्शांवर चालत महात्मा फुले यांच्या जन्म शताब्दी वर्षात १९२७ ला चवदार तळे सत्याग्रह केला. आपल्या गुरूने घर क्रमांक ३९५ मध्ये पहिली मुलींची शाळा उभी केली असेल तर त्यांना आदरांजली म्हणून ३९५ कलमांची राज्यघटना बाबासाहेब बहाल करतात. महात्मा फुलेंनी दत्तक घेतलेल्या पुत्राचं नाव यशवंत ठेवलं असेल तर बाबासाहेबही आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवतात, अशी ही गुरु शिष्याची आदर्शवत परंपरा चालत आली आहे. तसेच महापुरषांनी दुसऱ्यांचे दुःख व वेदनाही समजून घेतल्या आहेत. त्यामुळे आपणही इतरांचे दुःख व वेदना समजून घेतल्या पाहिजे. आपली वाणी प्रेमळ व रसाळ असली पाहिजे. आपला विज्ञानवादी दृष्टिकोन असला पाहिजे. संत रविदास महाराज यांची जयंती त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून साजरी करण्यात आली. आपण पुस्तकं वाचली पाहिजे. कारण पुस्तकं वाचणारं मस्तक कुणासमोरही नतमस्तक होत नाही. संविधानातील कलमांचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. त्यातील अधिकार आपल्याला माहित असले पाहिजे. कदाचित संविधानातील काही कलमांची अंमलबजावणी झाली नसेल, त्यावर प्रश्न विचारण्याची धमक आपल्यात असली पाहिजे, असे खणखणीत विचार प्रख्यात विचारवंत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश अध्यक्ष मीना भागवतकर, महिला आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिता लांडगे, युवती आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रणोती बांगडे, राज्य उपाध्यक्ष रेखा लिपटे, विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे, राज्य कोषाध्यक्ष मिनाक्षी डुबे, तालुकाध्यक्ष वंदना लिपटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर मान्यवर व कार्यक्रमाच्या अध्यक्ष किरण देरकर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका आसोरे यांनी केले. संचालन देवेन्द्र बच्चेवार यांनी तर आभार प्रदर्शन भारती वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी