गुन्हेगारीकडे वळणारी पाऊले रोजगाराकडे वळविण्याचा जिल्हा पोलिस दलाचा उपक्रम, शहरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
प्रशांत चंदनखेडे वणी
बेरोजगारीमुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू लागलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा अभूतपूर्व उपक्रम जिल्हा पोलिस दलातर्फे राबविण्यात येत आहे. बेरोजगार तरुणांच्या फौजा तयार होऊ लागल्याने त्यांना सुरक्षा रक्षकांच्या फौजमध्ये भरती करण्याचं अनन्य साधारण कार्य जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणारी तरुणांची पाऊले रोजगाराकडे वळविण्याचा जिल्हा पोलिस दलाने हाती घेतलेला उपक्रम ही आज काळाची गरज बनली आहे. जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची स्तुत्य संकल्पना जिल्हा पोलिस दलाकडून आखण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाकडून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत वणी शहरातही रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी मंदिर मंगल कार्यालयात हा रोजगार मेळावा होणार आहे.
शाळा कॉलेज सोडलेल्या तरुणांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या वाटा उपलब्ध करून देण्याचा संकल्प जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) व सुरक्षा पर्यवेक्षक (Supervisor) या पदांकरिता ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांच्या भरती करीता आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अटी पूर्ण करणाऱ्या तरुणांची थेट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षक पदासाठी शिक्षण ८ वी ते १२ वी पास किंवा नापास तथा उंची मुलांसाठी १६५ तर मुलींसाठी १५५ सेमी आणि वय १९ ते ३८ वर्षे असणे आवश्यक राहणार आहे. तसेच पर्यवेक्षक पदासाठी पदवी आणि एनसीसीचे प्रमाणपत्र तथा उंची १७२ सेमी आणि वयोमर्यादा २५ ते ४० वर्षे राहणार आहे. या पदांसाठी निवड झालेल्या तरुणांना १८ ते २२ हजार रुपयांपर्यंत पगार राहणार आहे.
उमेदवारांची निवड झाल्यानांतर त्यांना कॅपिटल फोर्स इंडिया लिमिटेड हैद्राबाद येथे २१ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना आवश्यकतेनुसार मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बँक, कार्पोरेट कार्यालय, आयटी, आईटीएस, आवासीय, उद्योग आणि इतर कारखाने, शाळा, दवाखाने, कंपन्या, आतिथ्य हॉटेल, रिसॉल्ट, विआयपी सुरक्षा आदी वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक देण्यात येणार आहे. वयच्या ६० वर्षांपर्यंत उमेदवाराला या पदांवर नौकरी करता येईल. नियमानुसार सर्वच सोइ, सुविधा उमेदवाराला दिल्या जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला प्रशिक्षण काळात राहणे, जेवण, युनिफॉर्म व बूट इत्यादींसाठी ८ हजार ३०० रुपये भरावे लागतील. अधीक माहितीसाठी पीएसआय सुदामा आसोरे व पो. हवा. आत्राम यांचेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप व एसडीपीओ गणेश किंद्रे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. बेरोजगार तरुणांनी या संधीचं सोनं करून घेण्याचं आवाहन जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आलं आहे.
Comments
Post a Comment