तालुक्यात रेती तस्करीला उधाण, एसडीपीओ पथकाने पकडला रेती चोरी करणारा ट्रॅक्टर
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरासह तालुक्यात रेती तस्करीला अक्षरशः उधाण आले आहे. वाळू चोरी करण्यात चोरटे प्रचंड तरबेज झाले आहेत. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून वाळू माफिया रेती तस्करी करीत आहेत. रेती घाटांवरून अवैधरित्या रेतीचा उपसा व वाहतूक करून ती सर्रास काळ्या बाजारात विकली जात आहे. आणि महसूल विभाग मात्र गपगुमान बसला आहे. महसूल अधिकाऱ्यांवर शिरजोर होऊन वाळू माफिया वाळूची तस्करी करीत आहेत. तर महसूल अधिकारी हतबल होऊन त्यांची मुजोरी खपवून घेत आहेत. नुकतीच एका वाळू चोरीच्या ट्रॅक्टरवर कार्यावाही करतांना येथील नायब तहसीलदारांवरच वाळू चोरटा भारी पडल्याची घटना उघडकीस आली होती. नायब तहसीलदारांना धक्का देऊन चोरट्याने त्यांच्या डोळ्यासमोर रेती भरलेला ट्रॅक्टर पळवून नेला होता. एवढ्यापर्यंत वाळू चोरट्यांच्या हिंमती वाढल्या आहेत. महसूल विभाग रेती तस्करांविरुद्ध कार्यवाहीचा बडगा उगारत नसल्याने ते प्रचंड निर्ढावले आहेत. प्रशासनापुढे "झुकेगा नही" ही तस्करांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तस्करांऐवजी महसूल विभागाचेच धाबे दणाणत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. एसडीपीओ पथकाने मात्र रेती चोरी करणारा ट्रॅक्टर पकडून मुकुटबन पोलिस स्टेशनला लावला आहे. तेजापूर येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करून एसडीपीओ पथकाने वाळू भरलेला ट्रॅक्टर जप्त केला असून स्वप्नील रामचंद्र मालेकर (३०) रा. तेजापूर या वाळू चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी ट्रॅक्टर व रेती असा एकूण ७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कार्यवाही १७ फेब्रुवारीला रात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रशांत ठमके रा. पठारपूर याचा शोध घेण्याकरिता एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्यासह एसडीपीओ पथक खाजगी वाहनाने मुकुटबनकडे जात होतं. दरम्यान आसपासच्या गावात गस्त घालत असतांना पथकाला रात्री १ वाजताच्या सुमारास तेजापूर-आमलोन मार्गावर एक रेती भरलेला ट्रॅक्टर सुसाट जातांना दिसला. एसडीपीओ पथकाने या ट्रॅक्टरला थांबवून चौकशी केली असता ट्रॅक्टरमध्ये चोरीची वाळू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ट्रॅक्टर चालकाजवळ रेती वाहतुकीचा परवाना तर नव्हताच पण ट्रॅक्टरचे कागदपत्र देखील त्याच्या जवळ नव्हते. ट्रॅक्टर चालकाकडे रेतीचा परवाना व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे एसडीपीओ पथकाने वाळू चोरी करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या स्वप्नील मालेकर या ट्रॅक्टर चालकावर बीएनएसच्या कलम ३०३(२), सहकलम ४८ व मोटार वाहन कायदा १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कार्यवाहीत एसडीपीओ पथकाने ट्रॅक्टर व ४ ब्रास रेती असा एकूण ७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे व एसडीपीओ कार्यालयीन पथकातील विजय वानखेडे, इक्बाल शेख, संतोष कालवेलवार, अतुल पायघन यांनी केली.
Comments
Post a Comment