संजय खाडे यांच्यासह आठही जणांचे निलंबन मागे, काँग्रेस पक्षाने जाहीर केला आदेश
प्रशांत चंदनखेडे वणी
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने काँग्रेस मधून निलंबित करण्यात आलेल्या संजय खाडे यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून त्यांना काँग्रेस पक्षाने पक्षाचं कार्य करण्याची परत एकदा संधी बहाल केली आहे. त्यांच्यासह त्याच्या सात सहकाऱ्यांचे काँग्रेस मधून निलंबन करण्यात आले होते. या सर्वांना परत काँग्रेस पक्षात सामावून घेण्यात आले आहे. संजय खाडे यांच्यासह आठही जणांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या विनंती वरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आठही पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश रद्द करून त्यांना पक्षात कार्य करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार काँग्रेसचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) यांनी अधिकृत पत्र देऊन त्यांचे निलंब मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.
नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उबाठा) या तीन प्रमुख पक्षांसह मित्र पक्षांनी एकत्रितपणे लढविली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत जागा वाटप करतांना वणी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला गेला होता. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याच्या ठाम भूमिकेत असलेल्या संजय खाडे यांचा अपेक्षाभंग झाला. काँग्रेसचा पारंपरिक गड असलेला वणी मतदार संघ शिवसेनेच्या कोट्यात गेल्याने नाराज झालेल्या संजय खाडे यांनी बंडखोरी करीत आपली वेगळी चूल मांडली. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे पक्षाचा निर्णय न मानल्याने संजय खाडे यांच्यासह त्यांची बाजू घेणाऱ्या नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, पलाश बोढे, वंदना आवारी, प्रमोद वासेकर, शंकर वऱ्हाटे व प्रशांत गोहोकार या आठही जणांना पक्षातून निष्कासित करण्यात आले होते. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचे निलंबन मागे घेण्याकरिता पक्षश्रेठींकडे आग्रह धरल्याने या आठही जणांना पक्षात काम करण्याची संधी बहाल करण्यात आली आहे.
संजय खाडे यांच्यासह आठही नेत्यांचे स्थानिक पातळीवर काँगेसच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान राहिले आहे. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे. त्यांनी पक्षाचं कार्य इमाने इतबारे केलं आहे. वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष वाढविण्यात व पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. पक्षाच्या प्रतिष्ठेनुसार त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक महत्वपूर्ण राजकीय उपक्रम व सोहळे आयोजित केले. पक्ष कार्यात सदैव तत्पर असलेल्या संजय खाडे यांच्यासह आठही पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने न्याय निवाडा केला असल्याची भावना त्यांच्या मधून व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षात कार्य करण्याची परत एकदा संधी बहाल केल्याने संजय खाडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment