मारेगाव व पाथरी गावातील विविध समस्यांना घेऊन कम्युनिस्ट नेते बसले उपोषणाला
प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव व पाथरी गावातील विविध समस्या व प्रश्नांना घेऊन मारेगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन छेडले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ६७ वर्षीय नेते कॉ. पुंडलिक ढुमणे हे २० फेब्रुवारी पासून पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत समस्या सुटणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
गावाच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात या घोष वाक्यासह लढेंगे तो जितेंगे, हा नारा देत कॉ. पुंडलिक ढुमणे यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. मारेगाव व पाथरी गावातील समस्या जोपर्यंत निकाली काढण्यात येणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाथरी येथील स्मशानभूमीची जागा अतिक्रमण मुक्त करण्यात यावी, घरगुती स्मार्ट मीटर लावणे बंद करावे, बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावावी, आठवडी बाजार रस्त्यावर न भरविता तो इतरत्र भरवावा आदी मागण्यांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्या सोडविण्याची तसदी न घेतल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा कॉ. पुंडलिक ढुमणे यांनी दिला आहे. कॉ. पुंडलिक ढुमणे यांनी उपोषण सुर करते वेळी उपोषण मंडपात कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, कॉ. रामभाऊ जिद्देवार, कॉ. श्रीकांत तांबेकर, कॉ. सुदर्शन टेकाम हे उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मारेगाव शाखेने मारेगाव व पाथरी गावातील समस्यांना घेऊन उपोषणाचे हत्यार उपसल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. प्रशासनाकडून समस्यांचं निराकरण करण्याकरिता हालचाली सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Comments
Post a Comment