मोबाईल शॉपीमध्ये गाणे वाजविण्याच्या कारणावरून घातला वाद, लाकडी काठी व चाकू मारून केले जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
मोबाईल शॉपीमध्ये गाणे वाजविण्याचा कारणावरून दोन भावंडांनी मोबाईल शॉपीमध्ये काम करणाऱ्या तरुणासोबत वाद घालत त्याला लाकडी दांड्याने मारहाण करतांनाच त्याच्यावर चाकूने हल्ला चढविल्याची घटना झरी येथे घडली. चाकूचा वार हाताने रोखल्याने तरुणाच्या हाताला दुखापत झाली आहे. याबाबत त्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी दोनही भावंडांवर गुन्हा दाखल केला आहे.
पाटणबोरी ता. केळापूर येथे वास्तव्यास असलेला जीत विनोद सोळंकी (२२) हा तरुण झरी येथील महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत आहे. त्याचा मित्र असलेल्या राहुल बोगावार याची झरी येथे मोबाईल शॉपी आहे. १९ फेब्रुवारीला जीत हा मोबाईल शॉपीवर काम करीत असतांना सायंकाळी ७.३० वाजता झरी येथे राहणारा गणेश हनुमंतु पस्तुलवार (२०) हा दुकानाजवळ आला व दुकानात गाणे का वाजवतो म्हणून त्याच्याशी वाद घालू लागला. तसेच त्याने जीतला शिवीगाळ करीत त्याला धक्काबुक्कीही केली. तुला पाहून घेतो, तुझी दुकान जाळतो, असे बरळत तो तिथून निघून गेला. नंतर काही वेळाने गणेश हा त्याचा भाऊ मोठा आकाश हनुमंतु पस्तुलवार (२४) याला सोबत घेऊन दुकानाजवळ आला. आकाश व गणेशने परत जीतशी वाद घालत आकाशने त्याला लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. आकाशने जीतच्या डोक्यावर व पाठीवर लाकडी काठीने मारून त्याला जखमी केले. तर गणेशने जीतवर चाकूने हल्ला चढविला. गणेश चाकू हातात घेऊन जीतला मारण्याकरिता आला असता जीतने त्याच्या जवळील चाकू आपल्या हाताने रोखून धरला. त्यामुळे त्याच्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली आहे.
गणेशने विनाकारण वाद घालून आपल्या भावाला सोबत घेऊन लाकडी काठीने मारहाण व चाकू उगारल्याने जखमी झालेल्या जीत सोळंकी याने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी गणेश व आकाश पस्तुलवार या दोन्ही आरोपी भावंडांवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पाटण पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment