साधनकरवाडी येथे धाडसी घरफोडी करणारे चोरटे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या साधनकरवाडी येथील बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. वर्धा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चोरी प्रकरणात अटक केलेल्या चोरट्यांनी शहरातील साधनकरवाडी येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. वर्धा पोलिसांनी याबाबत वणी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी डीबी पथक पाठवून वर्धा पोलिसांकडून या चोरट्यांची कस्टडी घेतली. या चोरट्यांना वणी पोलिस स्टेशनला आणल्यानंतर डीबी पथकाने त्यांची आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीत सहभागी असलेल्या आपल्या अन्य एका साथीदाराचे नाव सांगितले. डीबी पथकाने त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला वर्धा जिल्ह्यातीलच अल्लीपूर पोलिस स्टेशन हद्दीतून अटक केली. या तीनही चोरट्यांनी साधनकरवाडी येथे घरफोडी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांचीही तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.
शहरातील साधनकरवाडी येथे वास्तव्यास असलेले प्रदीप चिंडालिया हे २५ जानेवारीला परिवारासह दूरच्या प्रवासाला गेले होते. घराला कुलूप लागले असल्याने चोरट्यांनी संधी साधून चोरीचा डाव साधला. दरवाजाचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेऊन असलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख २ लाख रुपये असा एकूण १४ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ३ फेब्रुवारीला जेंव्हा घरकाम करणारी महिला प्रदीप चिंडालिया यांच्या घरी साफसफाई करण्याकरिता आली तेंव्हा तिला प्रदीप चिंडालिया यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. आणि ही घरफोडीची घटना उघडकीस आली. शहरात मोठी व धाडसी घरफोडी झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिसांनी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टला पाचारण करून संपूर्ण तपास यंत्रणा चोरट्यांचा शोध घेण्याकरिता कामी लावली. परंतु चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. अशातच वर्धा गुन्हे शाखा पथकाने चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांनी वणी येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यावरून वर्धा पोलिसांनी २० फेब्रुवारीला वणी पोलिसांशी संपर्क साधून या घरफोडी प्रकरणाची शहानिशा केली. वर्धा पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांनी शहरातील साधनकारवाडी येथेही जबरी चोरी केल्याचे निष्पन्न होताच ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी तात्काळ डीबी पथकाला वर्धा येथे रवाना केले. डीबी पथकाने वर्धा पोलिसांकडून या दोन्ही चोरट्यांची कस्टडी घेऊन त्यांना वणी पोलिस स्टेशनला आणले.
डीबी पथकाने या चोरट्यांची आणखी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या घरफोडीत सहभागी असलेल्या आपल्या अन्य एका साथीदाराचे नाव सांगितले. डीबी पथकाने त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्यालाही अटक केली. साधनकरवाडी येथील धाडसी घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुनिल उर्फ रॉकी शांताराम शिंदे (२३) रा. बोरगाव टेकडी, ता. जि. वर्धा, चंदू हिरा बतकल (३९) रा. वरोरा जि. चंद्रपूर, अरबाज सत्तार खान पठाण (२३) रा. तळेगाव टालाटोली ता. जि. वर्धा या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिघांचाही ३ दिवसांचा पीसीआर मंजूर केला. पोलिस तपासात त्यांच्या कडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, डीबी पथक प्रमुख धीरज गुल्हाने व डीबी पथकाने केली.
Comments
Post a Comment