गौरकार कॉलनी जवळून होणारा डीपी रोड अतिक्रमणाच्या विळख्यात, मालकी हक्क सांगितल्याने डीपी रोड बाबत निर्माण झाला संभ्रम
लोकसंदेश वृत्तांकन
शहरात अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. खुल्या जागेवर व रस्त्यालगत अतिक्रमण करतांनाच आता अतिक्रमण धारकांनी चक्क रस्तेच काबीज करणे सुरु केले आहे. गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन जवळ) येथे व्यावसायिक बांधकाम करणाऱ्या एका बांधकाम धारकाने डीपी रोडसाठी असलेल्या जागेवर मालकी हक्क सांगितल्याने येथील रहिवाशी संभ्रमात पडले आहेत. या व्यक्तीने डीपी रोडसाठी असलेल्या जागेवर पक्के बांधकाम केले आहे. गौरकार कॉलनी परिसरात रेल्वे विभागाची हद्द संपल्यानंतर जवळपास १०० फूट जागा खुली आहे. येथे डीपी रोड बनणार असल्याचे अनेक वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र आता गौरकार कॉलनी येथे व्यावसायिक बांधकाम करतांना बांधकाम धारकाने डीपी रोडसाठी खुल्या असलेल्या जागेवर मालकी हक्क सांगून पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे आता येथील नागरिकही डीपी रोडसाठी असलेल्या खुल्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या तयारीला लागले आहेत.
अशातच डीपी रोडसाठी असलेल्या खुल्या जागेवर वयक्तिक प्लॉट असल्याचा दावा करून पक्के घर बांधलेल्या एका कुटुंबाने तर आता घरासमोरील जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच आपला हक्क गाजवायला सुरवात केली आहे. जाण्यायेण्याच्या रस्त्यावर मोठमोठी झाडे टाकून जाण्यायेण्याचा रस्ताच बंद केला आहे. वणी वरोरा मार्गापासून तर वणी नांदेपेरा मार्गापर्यंत डीपी रोडसाठी खुल्या असलेल्या जागेवर काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेले असतांनाच आता एका व्यक्तीने या खुल्या जागेवर प्रत्यक्ष मालकी हक्क सांगितल्याने येथील नागरिकही आता आपाल्या घरासमोरील जागा आरक्षित करू लागले आहेत. १०० फुटांचा डीपी रोड अतिक्रमणाच्या विळख्यात अडकू लागला असतांना नगरपालिका प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन) हा अतिशय जुना परिसर आहे. हा परिसर रेल्वे विभागाला लागून असल्याने येथे सेवानिवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घरे बांधली आहेत. रेल्वे विभागाची हद्द संपल्यानंतर १०० फुटांची जागा खुली आहे. याठिकाणी १०० फुटांचा रोड होईल असे अनेक वर्षांपासून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही या जागेवर अतिक्रमण केले नाही. मात्र आता डीपी रोडसाठी असलेली जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकू लागली आहे. येथे व्यावसायिक बांधकाम करणाऱ्या एका व्यक्तीने तर चक्क डीपी रोडसाठी असलेल्या जागेवरच आपला मालकी हक्क दर्शवून पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे आता डीपी रोड बाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच या डीपी रोडवरच वयक्तिक प्लॉट असल्याचे सांगून एकाने पक्के घर बांधले आहे. आता या कुटुंबाने घरासमोरील खुल्या जागेवर कब्जा करायला सुरवात केली आहे. त्यांनी चक्क जाण्यायेण्याच्या रोडवरच झाडे टाकून रोड बंद केला आहे. याकडे नगर पालिकेने वेळीच लक्ष न दिल्यास अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा डीपी रोड गायब झाल्याशिवाय राहणार नाही. येथील नागरिकही आता आपापल्या घरासमोरील जागा आरक्षित करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे शहरात परत एक अतिक्रमित वस्ती तयार होणार असल्याची चिन्हे दिसून लागली आहेत.
Comments
Post a Comment