अल्पवयीन मुलगी झाली बाळंतीण आणि फुटले बाल विवाहाचे बिंग, तिच्याशी लग्न करणाऱ्या युवकासह आई वडिलांवर गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
बाल विवाहावर कायद्याने बंदी आणली असतांना देखील कायद्याचे उल्लंघन करून अल्पवयीनांचे लग्न लावून दिले जात आहे. असाच एक बाल विवाहाचा धक्कादायक प्रकार वणी पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आला आहे. एका १३ वर्षीय बालिकेचे चक्क आई वडिलांनीच लग्न लावून दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही मुलगी बाळंतीण झाल्यानंतर तिचा बालविवाह झाल्याचे उघडकीस आले आहे. पालकांनी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली. बालिकेच्या वयाचे व लग्नाचे सर्व पुरावे गोळा करून पोलिसांनी आई वडील व तिच्याशी लग्न करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. आरोपी युवकाला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.
वणी शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथे बाल विवाह झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पाषाणहृदयी आई वडिलांनी (२३ जून २०२३) आपल्या अवघ्या १३ वर्षाच्या मुलीचे लग्न लावून दिले. खेळण्या बागडण्याच्या दिवसांत या बालिकेला बोहल्यावर चढविण्यात आले. तिच्याशी लग्न करणाऱ्या युवकानेही तिच्या वयाचं भान ठेवलं नाही. या युवकाने अगदी डोळे बंद करून तिच्याशी लग्न केलं. स्वतःचं जीवन कळण्याआधीच तिच्यावर संसार व वैवाहिक जीवनाची जबाबदारी लादण्यात आली. या बालिकेशी विवाह केल्यानंतर बालिकेवर मातृत्व लादण्यात आलं. बालवयात ही मुलगी आई झाली. सवंगड्यांसोबत खेळण्याच्या वयात तिच्यावर नवजात बाळाला सांभाळण्याची वेळ आली आहे. अल्पवयात तिने एका मुलाला जन्म दिला. साक्षरतेच्या या युगातही काही क्रूर आई वडील मुलींबाबत अकर्तव्यदक्षपणा बाळगत आहेत. मुलींना भार समाजण्याची मानसिकता अजूनही त्यांच्या सडक्या मेंदूतुन गेलेली नाही. अवघ्या १३ व्या वर्षी लग्न करून देण्याइतपत अन्यायकारक भूमिका घेणाऱ्या आई वडिलांमुळेच मुली अजूनही प्रताडित होत आहेत. कठोर मनाच्या आई वडिलांनी वयाच्या १३ व्या वर्षी मुलीचं लग्न लावून दिलं. आणि बालवयातच ती बाळंतीण झाली. त्यामुळे या बाल विवाहाचे बिंग फुटले.
अल्पवयीन मुलगी बाळंतीण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या बाल विवाहाची जंत्रीच शोधून काढली. राजूर (कॉ.) येथील रहिवाशी असलेल्या मुकेश भवरा निषाद (२५) याच्याशी रामबरण केवट (५०) व त्याची पत्नी (४५) रा. निंभोरा ता. बदेरू जि. बांदा (उ.प्र.) यांनी आपल्या १३ वर्षीय मुलीचे लग्न लावून दिले. त्यानंतर या बालिकेला गर्भधारणा झाली. २२ फेब्रुवारीला प्रसूती करीता तिला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात तिने मुलाला जन्म दिला. अल्पवयीन मुलगी बाळंतीण झाल्याची माहिती नंतर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर या मुलीचा बाल विवाह झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या मुकेश निषाद याच्यासह मुलीचे वडील रामबरण केवट व त्याची पत्नी यांच्यावर भादंवि च्या कलम ३७६(२)(N) व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती करणाऱ्या मुकेश निषाद याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पांढरकवडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि निलेश अपसुंदे करीत आहे.
Comments
Post a Comment