रोजगाराच्या वाटा उपलब्ध करून देणाऱ्या रोजगार मेळाव्यात १३०२ उमेदवारांनी दिल्या मुलाखती

प्रशांत चंदनखेडे वणी 

तरुणपिढी ही देशाचं भविष्य आहे. तरुणाईवरच देशाची भिस्त उभी आहे. परंतु सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालल्याने कळत नकळत युवावर्ग गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू लागला आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. युवक दिशाहीन होत चालला आहे. त्यामुळे त्याला योग्य दिशेकडे वळविणे गरजेचे झाले आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन यवतमाळ जिल्हा पोलिस दलाकडून "ऑपरेशन प्रस्थान" अंतर्गत शहरात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकार झाला. या स्तुत्य उपक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकरी मंदिर येथे आयोजित या रोजगार मेळाव्याला १० नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली होती.  

हा रोजगार मेळावा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सर्वप्रथम त्यांनी रोजगार मेळाव्यात मुलाखती करीता आलेल्या उमेदवारांशी संवाद साधला. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ११ कंपन्यांच्या प्रतिनिधींचा त्यांनी परिचय करून दिला. त्यानंतर कंपनींच्या प्रतिनिधींनी कंपनी व जॉबबद्दल उपस्थितांना माहिती दिली. रोजगार देणाऱ्या अधिकाधिक कंपन्या ह्या हैद्राबादच्या होत्या हे याठिकाणी विशेष.

वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन व पाटण पो.स्टे. हद्दीतील युवक व युवतींनी या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये रोजगाराकरिता ११०२ युवक व ११८ युवतींनी नोंदणी केली होती. रोजगार मेळाव्यात एकूण १३२० युवक युवतींच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरच कंपनीकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी सर्व कंपन्यांचे वेगवेगळे स्टॉल लागले होते. या मेळाव्यातुन शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा विश्वास दर्शविण्यात आला. जवळपास सर्वच कंपन्यांकडून उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या शिबिराच्या उत्तम नियोजनाची जबाबदारी वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. येथे उमेदवारांना निकषांची अडचण आल्यास त्यांना अन्य ठिकाणी संधी मिळेल, असा आशावाद या दोनही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

वणीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, मारेगावचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके, मुकुटबनचे ठाणेदार दिलीप वडगावकर, शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे, पाटणचे पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे यांनी वणी उपविभागात या रोजगार मेळाव्याबाबत जनजागृती करून युवावर्गाला मेळाव्याचा लाभ घेण्याकरिता प्रोत्साहित केले. सर्व पोलीस स्टेशनचे स्वतंत्र स्टॉल मेळाव्याच्या प्रवेशद्वारावर लागले होते. पोलिसांकडून मेळाव्याला येणाऱ्या उमेदवारांची नोंदणी आणि त्यांच्या शंकांचे व्यवस्थित समाधान करण्यात येत होते. उन्हाचे दिवस असल्याने ठिकठिकाणी पिण्याच्या गार पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांसाठी मोफत भोजन व्यवस्था आणि ती देखील नियोजित वेळेत करण्यात आली होती. या मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता पोलिस बंधूंनी विशेष परिश्रम घेतले. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी