प्रशांत चंदनखेडे वणी
चंद्रपूर येथे उपचारासाठी गेलेल्या घरमालकावर चोरट्यांनी परत सलाईन चढविण्याची वेळ आणली आहे. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील किंमती वस्तू व रोख रक्कमेवर हात साफ केला. कुलूपबंद घर हे चोरट्यांसाठी चोरीचं आमंत्रण देणारं ठरू लागलं आहे. बंद घर आणि घरफोडी हे आता चोरीचं समीकरणच बनलं आहे. चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या साफल्य नगर येथील कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील साफल्य नगर येथे वास्तव्यास असलेले भारत वसंतराव ठाकरे (४७) हे १५ फेब्रुवारीला उपचारासाठी चंद्रपूर येथे गेले होते. दरम्यान कुलूपबंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. कवाडाचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेऊन असलेले रोख ५० हजार रुपये, ३ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी किंमत १२ हजार रुपये, ५ ग्रामचा सोन्याचा गोप किंमत २० हजार रुपये, ६ ग्राम वजनाचे सोन्याचे कर्णफुले किंमत २४ हजार रुपये, ७ ग्राम चांदीचे चाळ असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता ही चोरीची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप कोंडा तोडून घरातील सोन्याचांदीच्या वस्तू व रोख रक्कमेवर डल्ला मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारत ठाकरे यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(a) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय निलेश अपसुंदे करीत आहे.
No comments: