Latest News

Latest News
Loading...

ऐकलं काय, वणी पोलिस स्टेशन मधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली

प्रशांत चंदनखेडे वणी 

पोलिसांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांनी वणी पोलिस स्टेशन सध्या गाजत आहे. संपूर्ण जिल्ह्यात वणी पोलिस स्टेशन हे चर्चेचा विषय बनलं आहे. पोलिसांच्या बेलगाम कार्यपद्धतीमुळे शहरातील शांतता भंग पावण्याचे चित्र निर्माण झाल्याने पोलिस खात्याविषयी जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. पोलिसांविरुद्ध जनआंदोलन उभारण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून पोलिसांवरच कार्यवाहीची मागणी होऊ लागली. पोलिसांचं बेशिस्त वागणं पचनी पडण्यासारखं नसल्याने राजकीय व सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. पोलिसांच्या थेट गृहमंत्री व पालकपत्र्यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्याने वणी पोलिस स्टेशनमध्ये निलंबन व बदल्यांचं सत्र सुरु झालं आहे. विविध प्रकरणात चर्चेत असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकफडकी बदली करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ठाणेदारांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर तीन पोलिस कर्मचाऱ्यांनाही स्थानांतरित करण्यात आल्याने वणी पोलिस स्टेशन चांगलंच चर्चेत आलं आहे. 

वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या कार्यकाळात पोलिस कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार पाहायला मिळाला. पोलिस कर्मचारी कर्तव्य विपरीत कामे करू लागल्याने शहरात पोलिसांविषयी असंतोष खदखदू लागला. ठाणेदारांची पोलिस कर्मचाऱ्यांवरची दोर सैल झाल्याने ते बेभान वागू लागले. पोलिस वर्तुळातीलच कर्मचाऱ्यांचं रेती तस्करीशी कनेक्शन असल्याची वार्ता सगळीकडे पसरली. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू पोलिस कर्मचाऱ्याच्या धमकीमुळे झाल्याचे प्रकरणही प्रचंड गाजले. याच काळात एक पोलिस कर्मचारी वर्दीतच नशेत तर्रर्र होऊन शुद्ध हरपल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. तसेच शेकडो गोवंश जनावरांची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. याचा ठपका ठेऊन ठाणेदार अनिल बेहेरानी यांची तडफडकी बदली करण्यात आली. तसेच वर्दीचे भान न ठेवता अति मद्य प्राशन करून तर्राट झालेल्या पोलिस जमादार गजानन डोंगरे यालाही निलंबित करण्यात आले. 

त्यानंतर आता विकास धडसे, शुभम सोनुले व सागर सिडाम या तीनही पोलिस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी  तडकफडकी बदली करण्यात आली आहे. जमादार विकास धडसे याच्यावर दिवंगत ललित लांजेवार यांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप स्वतः ललितच्या पत्नीने केला होता. ७ फेब्रुवारीला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विनोद मोहितकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन विकास धडसे याला ललितच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. तसेच या तीनही पोलिसांची नावे रेती तस्करीशी जोडल्या गेल्याने त्यांच्या बदलीच्या मागणीला घेऊन राजकीय व सामाजिक संघटना सरसावल्या होत्या. गुन्हेगारी वर्तुळावर नियंत्रण ठेवणारे पोलिसच तस्करांच्या पंगतीत बसल्याने कार्यवाहीची अपेक्षा तरी कुणाकडून करायची हा चर्चेचा विषय बनल्याने पोलिसांविरुद्धच कार्यवाहीची मागणी होऊ लागली. पोलिस खात्याविरुद्ध शहरवासीयांमधून उमटत असलेल्या प्रतिक्रिया बघता वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वणी पोलिस स्टेशन मधिल त्या तीनही कर्मचाऱ्यांची एकाच वेळी उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे निलंबन व बदल्यांचं सत्र सुरु असलेलं वणी पोलिस स्टेशन संपूर्ण जिल्ह्यात गाजत आहे. पोलिसच आरोपांच्या पिंजऱ्यात अडकल्याने गुन्हेगार मात्र मोकाट झाले आहेत. आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

No comments:

Powered by Blogger.