प्रशांत चंदनखेडे वणी
सहारा इंडियामध्ये ग्राहकांनी गुंतविलेले पैसे अनेक वर्षे होऊनही ग्राहकांना परत मिळाले नाही. सहारा इंडिया समूहाने गुंतवणूक केलेल्या ग्राहाकांची मोठी फसवणूक केली आहे. सेबीचे कारण पुढे करून सहारा समूह ग्राहकांच्या पैशाची परतफेड करण्यास टाळाटाळ करीत आहे. वणी येथील सहारा इंडियाचे कार्यालयही आता बंद झाल्याचेयेत आहे. हजारो नागरिकांचे लाखो रुपये सहारा इंडियामध्ये अडकून पडले आहेत. कधी तरी पैसे परत मिळतील या आशेवर ग्राहक आहेत. मात्र वेळोवेळी त्यांचा भ्रमनिरासच होतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सहारा महापोर्टलवर ऑनलाईन अर्ज तथा स्वतःची व गुंतवणुकी संदर्भातील माहिती भरल्यास बँक खात्यावर पैसे येतील असा फतवा काढण्यात आला होता. गुंतवणूकदारांनी आर्थिक भुर्दंड सहन करून ऑनलाईन माहितीही भरली. मात्र त्यांच्या बँक खात्यावर अद्याप एक रुपयाही आला नाही.
आता सहारा इंडिया मधील पैसे परत मिळविण्याकरिता नवीन संदेश प्रसारित करण्यात आला आहे. वकिलांमार्फत नोटरी केल्यानंतर व गुंवणूकीबद्दलची ऑनलाईन माहिती भरल्यानंतर खात्यावर पैसे जमा होतील, असा लिखित संदेश मोबाईल ग्रुप वरून वायरल करण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठीही गुंतवणूकदारांना पैसे मोजावे लागत आहे. सहारा इंडियामध्ये अडकलेले पैसे परत मिळतील या आशेपोटी ग्राहक कुणाच्याही आहारी जाऊन मागेल तेवढा पैसा देऊ लागले आहेत. सहारा इंडियाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून पैसे परतफेडी संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसतांना वणी येथे सहारा इंडियाचे पैसे मिळवून देण्याच्या नावावर नागरिकांच्या लुटीचा धंदा सुरु करण्यात आला आहे. सहारा इंडियामध्ये गुंतवणूक करून बसलेल्या नागरिकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन काही लोक आपली झोळी भरू लागले आहेत.
ग्राहकांना आर्थिक संपन्न करण्याचा गाजावाजा करीत गुंतवणूक क्षेत्रात उतरलेल्या सहारा इंडियाने ग्राहकांची मोठी फसवणूक केली. सहारा इंडिया आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेला एक मोठा समूह असल्याचे विविध माध्यमातून पटवून देण्यात आले. सहारा एअरलाईन्स, सहारा सिटी, सहारा एंटरटेन्टमेंट, सहारा फ्रेंचायजी एवढेच नाही तर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या गणवेशावरही सहारा इंडियाचा लोगो असायचा. या चमकोगिरीला बळी पडून लाखो ग्राहकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक सहारा इंडियामध्ये केली. सुरवातीला ग्राहकांचे पैसे वेळेत मिळाले. पण नंतर सहारा समूहाने गुंतवणूकदारांचा पैसा गोठवला. २५ ते ३० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी लोटला असेल की, नागरिकांना त्यांचा पैसा परत मिळाला नाही. कोरोना काळात उपचारासाठी पैसा मिळावा म्हणून सहारा इंडियाच्या वणी येथील कार्यालयाचे उंबरठे झिजवून एक महिला मरण पावली. पण तिला तिचाच पैसा मिळाला नाही. नागपूर येथील मंगळवारी कॉम्प्लेक्स येथे सहारा इंडियाचे कार्यालय सुरु आहे. पण तेथील अधिकारीही पैसा परत मिळण्याची शाश्वती देण्यास असमर्थता दर्शवितात.
काही दिवसांपूर्वी सहारा इंडिया महापोर्टलवर ऑनलाईन माहिती भरल्यास टप्प्याटप्प्याने पैसे परत मिळतील असा फतवा काढण्यात आला होता. अनेक ग्राहकांनी ऑनलाईन सेंटरवर जाऊन व आर्थिक भुर्दंड सहन करून ऑनलाईन माहिती भरली. मात्र अद्याप कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर एक रुपयाही आलेला नाही. आणि तशी सहारा इंडिया समूहाकडून पृष्ठीही देण्यात आलेली नाही. आता सहारा इंडियातून पैसे परत मिळविण्याचा नवीन संदेश प्रसारित झाला आहे. एका महाभागाने सहारा इंडियाचे पैसे परत मिळवून देण्याची हमी घेतली आहे. त्यासाठी त्याने आपल्या कार्यालयाचा पत्ता व मोबाईल नंबर प्रसारित करून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बँक पासबुक, आयडी व ऍड्रेस प्रूफ, फोटो, मोबाईल नंबर लिंक असलेले आधारकार्ड आदी कागदपत्रासह नागरिकांना बोलावून तो त्यांच्या गुंतवणुकी संदर्भात ऑनलाईन माहिती भरत आहे. त्यासाठी आता नोटरी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. यासाठी लागणारा एकंदरीत खर्च तो ग्राहकांकडून वसूल करीत आहे. तसेच गुंतवणूकदारांच्या बॉण्डवर शिक्का नसल्यास तो स्वतःच शिक्काही मारून देत असल्याची माहिती आहे. या महाभागाला सहारा इंडिया कडून नियुक्त करण्यात आले की, तो स्वतः सहारा इंडियाचा अधिकृत प्रतिनिधी आहे, हे ही कळायला मार्ग नाही. मात्र सहारा इंडिया कडून पैसे परत मिळण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकांचा तो पूर्ण फायदा घेत आहे.
सहारा इंडियाच्या अनेक ग्राहकांनी आपले विश्वासू, स्नेहसंबंधी व नातेवाईक असलेल्या एजंटच्या आग्रहास्तव सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केली होती. मात्र आता काही एजंट लुप्त झाले आहेत. तर काही एजंट पैसे परत मिळवून देण्याच्या या प्रकारची शहानिशाही करतांना दिसत नाही. त्यामुळे आपलेच पैसे परत मिळविण्याकरिता ग्राहकांना जो जसा म्हणेल, तसे त्याच्या भुलथापांना बळी पडावे लागत आहे. आधी ऑनलाईन माहिती भरतांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. तर आता ग्राहकांना नोटरी व परत तीच माहिती भरून पैशाचा चुराडा करावा लागत आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगून व शहानिशा करूनच पैशाचा खर्च करावा, असे आवाहन सुज्ञ जनतेकडून करण्यात येत आहे. अथवा नागपूर येथील कार्यालयीन अधिकाऱ्यांशी एकदा संपर्क साधूनच समोरील प्रक्रिया करावी. सहारा इंडियाच्या कार्यालयातून ही सर्व प्रक्रिया होणे अपेक्षित असतांना वेळोवेळी ग्राहकांच्याच खिशाला कात्री लावण्याचा प्रकार सर्रास सुरु झाला आहे. त्यामुळे या प्रक्रियेनंतरही सहारा इंडियाचे पैसे परत न मिळाल्यास हा संदेश प्रसारित करून पैसे परत मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महाभागावरच ग्राहकांनी पैसे परत मिळवून देण्याकरिता दबाव आणला पाहिजे. नाही तर सहारा इंडियाचे पैसे परत मिळवून देण्याच्या नावावर ग्राहकांची अशीच लूट सुरु राहील.
No comments: