प्रशांत चंदनखेडे वणी
दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ७ फेब्रुवारीला रात्री १० ते १०.१५ वाजताच्या सुमारास वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर घडली. दुचाकीस्वाराचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रुपेश नानाजी आत्राम वय अंदाजे २० वर्षे रा. हिवरी ता. मारेगाव असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील रहिवाशी असलेला हा तरुण रात्री दुचाकीने (MH २९ BR ३६१८) आपल्या गावी परतत असतांना सोमनाळा फाट्याजवळ त्याच्या दुचाकीला अपघात झाला. यात तो रोडवर पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रात्री मारेगाव येथील रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. रुपेश आत्राम हा कामानिमित्त कुठे गेला होता हे मात्र अद्याप कळू शकले नाही. त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. तसेच अपघाताची अजूनही पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली नसल्याने पोलिसही अद्याप कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाही. मात्र अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
No comments: