प्रशांत चंदनखेडे वणी
नागरिकांच्या घरातील नादुरुस्त व तांत्रिक बिघाड आलेले विद्युत मीटर बदलून स्मार्ट (प्रीपेड) मीटर लावण्याची प्रक्रिया महावितरण कडून सुरु करण्यात आली आहे. स्मार्ट (प्रीपेड) मीटर हे नागरिकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरू शकते. मोबाईल प्रमाणे रिचार्ज केल्यानंतरच हे मीटर वीज सेवा पुरविते. अन्यथा मीटर रिचार्ज संपल्यास नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शासनाने घरगुती स्मार्ट मीटर लावण्याचे अमलात आणलेले धोरण अन्यायकारक असून महावितरणने नागरिकांच्या घरात सक्तीने स्मार्ट मीटर (प्रीपेड) लावू नये, अशी मागणी शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख रवि बोढेकर यांनी वीज वितरण कंपनी वणीचे उप-अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शासनाने भांडवली कंपन्यांना खुश करण्याकरिता स्मार्ट (प्रीपेड) मीटर हे धोरण अमलात आणले आहे. घरगुती फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण शासनाकडून अमलात आणल्यानंतर महावितरण कडून देखील स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शासनाकडून स्मार्ट मीटर, ट्रान्स्फार्मर मीटर, फिडर मीटर व संबंधित सुविधेसाठी ३९ हजार ६०२ कोटीच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ६० टक्के अनुदान केंद्र सरकार देणार आहे. तर ४० टक्के रक्कम महावितरणला कर्ज घेऊन उभी करायची आहे. त्यानंतर महावितरणला व्याजासह या रक्कमेची परतफेड करावी लागणार आहे. त्यामुळे महावितरण दरवाढ प्रस्तावात या रक्कमेची मागणी करणार आहे. तेंव्हा नागरिकांवरच आर्थिक बोजा पडणार आहे. आधीच वीज दरवाढीने नागरिक त्रस्त आहेत. त्यात आणखी विज सेवा करात वाढ करून नागरिकांवर आर्थिक बोजा लादण्याचं काम शासनाकडून करण्यात येत आहे.
त्याचबरोबर घरगुती स्मार्ट मीटर लावण्यात आल्यानंतर महावितरणच्या कर्मचारी व कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. वीज बिल भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांसह, बिलिंग विभाग, मीटर रिडींग, बिल वाटप, तांत्रिक दुरुस्ती, मीटर टेस्टिंग या विभागातील हजारो कर्मचारी व कामगार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे मित्र कंपन्यांना खुश करण्यासाठी शासनाने अमलात आणलेले हे स्मार्ट (प्रीपेड) मीटर धोरण तात्काळ थांबविण्याबरोबरच वणी विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही नागरिकांच्या घरी हे स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख रवि बोढेकर यांनी वणी वीज वितरण कंपनीचे उप-अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. नागरिकांच्या घरी जर सक्तीने स्मार्ट मीटर लावल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रवि बोढेकर यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देतांना शिवसेनेचे (उबाठा) दीपक कोकास, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
No comments: