भीषण अपघात, ट्रॅक्टरने एकाचवेळी तीन मोटारसायकलला दिली धडक, एक ठार तर दोन गंभीर जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने भरधाव व लापरवाहीने ट्रॅक्टर चालवून एकाच वेळी तीन मोटारसायकलला धडक दिल्याची हृदयद्रावक घटना वणी यवतमाळ मार्गावरील राजूर रिंग रोडवर १७ फेब्रुवारीला रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. दोघांचीही प्रकृती अत्यवस्थ असून एकाला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. तर एका जनावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
राजूर (ई.) येथील रहिवाशी असलेल्या मारोती रासेकर या मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने राजूर रिंग रोडवर एकाच वेळी तीन मोटारसायकलला धडक दिली. सुधिर तोडेकर रा. राजूर (कॉ.) यांच्या मालकीचे हे ट्रॅक्टर असल्याचे सांगण्यात येते. ट्रॅक्टर चालकाने भरधाव व लापरवाहीने ट्रॅक्टर चालवून तीन मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक वेकोलि कर्मचारी मृत्युमुखी पडला. तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. भांडेवाडा कोळसाखाणीत कर्मचारी असलेले भारत हरी आवारी वय अंदाजे ४५ वर्षे रा. गुरुवर्य कॉलनी वणी हे आपले कर्तव्य आटपून घराकडे परतत असतांना त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर पंढरी भास्कर ढोके वय अंदाजे २७ वर्षे रा. बोर्डा व विपीन खैरे रा. मारेगाव हे दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पंढरी ढोके याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला रेफर करण्यात आले आहे. तर विपीन खैरे याच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालकाला उपस्थितांनी चांगलाच चोप दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र वेकोलि कर्मचारी भारत आवारी यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment