प्रशांत चंदनखेडे वणी
जिद्द, चिकाटी व परिश्रम हे यशाचे गुणसूत्र आहेत. जीवनात यशस्वी होण्याची जिद्द बाळगली की, कुठलाही प्रसंग व परिस्थिती अडथळा बनत नाही. शैक्षणिक भवितव्य घडविण्याच्या काळात कठोर मेहनत घेतली तर यशाला गवसणी घालता येते. विद्यार्थी दशेत विद्यार्जनाला महत्व दिले की, यशस्वी जीवन घडविण्याचा मार्ग मोकळा होतो. वणी शहरालगत असलेल्या लालगुडा या गावातील अशाच एका शैक्षणिक भवितव्य घडविण्याची जिद्द मनी बाळगणाऱ्या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून यशस्वी जीवनाची मुहूर्तमेढ रोवली आहे. एमपीएससी (MPSC) स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या या विद्यार्थिनीची महसूल सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. कु. अनुकंपा महेंद्र पाटील असे या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या होतकरू विद्यार्थिनीचे नाव आहे.
कु. अनुकंपा ही सर्वपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांची मुलगी आहे. महेंद्र पाटील यांनी मुलीच्या शिक्षणात कुठलीही बाधा येऊ दिली नाही. कुटुंबीयांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याने अनुकंपाने स्पर्धा परीक्षेत यशस्वी भरारी घेतली. तिच्या यशात कुटुंबीयांचाही सिंहाचा वाटा आहे. तिला शैक्षणिक वातावरण मिळाल्याने तिचा यशाचा मार्ग सुकर झाला. कु. अनुकंपा महेंद्र पाटील या विद्यार्थिनीची एमपीएससीतून महसूल सहाय्यक पदासाठी निवड झल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण गाव तिच्या यशाचा आनंद साजरा करीत आहे. तिने आई वडिलांच्या मेहनतीचे चीज करून दाखविले आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व शिक्षकांना दिले आहे. कु. अनुकंपा पाटील हिच्या पुढील यशस्वी वाटचाली करीता लोकसंदेश न्यूज परिवाराकडून शुभेच्छा.
No comments: