बुद्धगया मुक्ती आंदोलनाला वाढता प्रतिसाद, वणी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन तर राजूर दीक्षाभूमी विहार समितीने दिले निवेदन
प्रशांत चंदनखेडे वणी
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशात तीव्र झालेलं असतांनाच वणी येथेही या आंदोलनाला हुंकार भरण्यात आला आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मागणीला घेऊन सोमवार १० मार्चला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बौद्ध बांधवांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. तर वणी तालुक्यातील राजूर कॉलरी दीक्षाभूमी विहार समितीच्या वतीने १९५० सालचा टेम्पल ऍक्ट कायदा रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांकडे देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
बुद्धगया महाबोधी महाविहार हे अनेक वर्षांपासून एका विशिष्ट समुदायाच्या कब्जात आहे. त्यांनी बुद्धगया महाविहारावर अनधिकृत ताबा घेतला आहे. अनेक वर्षांपासून बौद्धांचे पवित्र स्थळ असलेल्या महाबोधी महाविहारावर धार्मिक अतिक्रमण करून येथे तळ ठोकून बसलेल्या या समुदायाने बौद्ध धम्माशी विसंगत धार्मिक विधी चालविल्या आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांना अवतारीत भासविण्याचा पद्धशीर प्रयत्न केला जात आहे. येथे देश विदेशातून बौद्ध भन्ते व बौद्ध बांधव येतात. बौद्धांना अभिप्रेत असलेले विधी व कार्य येथे होणे अपेक्षित असतांना एका विशिष्ट धार्मिक पद्धतीचा प्रचार येथे होतांना दिसतो. बौद्धस्थळी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचं अवलोकन करणे गरजेचे असतांना तेथे धार्मिक अवडंबर केला जात आहे. प्रत्येक धर्मियांच्या प्रेरणास्थळांवर त्या त्या समुदायाचा ताबा असतो. परंतु बौद्ध बांधवांच्या या प्रेरणास्थळावर एका विशिष्ट समुदयायाने कब्जा केला आहे. त्यामुळे हा अनधिकृत कब्जा हटविण्याकरिता अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धार आता तीव्र झाली आहे. बुद्धगया महाबोधी विहारावर गैरबौद्धांचा असलेला ताबा हटवून महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावं, या मागणीला घेऊन देशात तीव्र आंदोलन केलं जात आहे. देश विदेशातील भंते बुद्धगया मुक्त करण्याकरिता महाबोधी महाविहार येथे अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आता देशातील बौद्ध बांधव एकवटले आहेत.वणी येथेही बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरु असलेल्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला असून सोमवारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बौद्ध बांधवांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याची जोरदार मागणी या एकदिवसीय धरणे आंदोलनातून करण्यात आली. त्याचप्रमाणे राजूर कॉलरी दीक्षाभूमी विहार समितीच्या वतीनेही बुद्धगयेचं व्यवस्थापन बौद्धांकडे देण्याची मागणी करण्यात आली असून त्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हा लढा उभारण्यात आला असून महाबोधी विहाराचा ताबा घेल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा निर्धार वणी येथील धरणे आंदोलनातून व्यक्त करण्यात आला. या धरणे आंदोलनात व निवेदन देतांना मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.
No comments: