चोरटे झाले शातीर, प्लॅस्टिक पट्टीच्या साहाय्याने एटीएम मधून पैसे चोरतांना दोन चोरट्यांना अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
चोरटे चोरीच्या विविध शक्कली लढवू लागले आहेत. चक्क एटीएम मधून पैसे चोरी करण्याचा घाट चोरट्यांनी रचला. एटीएम मधून पैसे चोरी करण्याचा डाव साधत असतांना सतर्क असलेल्या शिरपूर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. एटीएम मधून पैसे चोरी करतांना शिरपूर पोलिसांनी दोन चोरट्यांना रंगेहात अटक केली आहे. ही कार्यवाही ११ मार्चला करण्यात आली. या चोरट्यांनी याआधीही एटीएम मधून पैसे चोरी केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.
शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चारगाव चौकी येथे हिताची कंपनीच्या असलेल्या एटीएम मधून चोरटे पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. या माहिती वरून शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी एटीएम रुमध्ये जाऊन पाहिले असता तेथे दोन चोरटे प्लॅस्टिक पट्टीच्या साहाय्याने एटीएम मधून पैसे काढतांना आढळून आले. एटीएम मधून पैसे चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोनही चोरट्यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. सुशिल वसंत तोडेकर (३६) व नरेश रामदास घुगुल (३३) दोघेही रा. बल्लारपूर जि. चंद्रपूर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोनही चोरट्यांची आणखी कसून चौकशी केली केल्यानंतर त्यांनी २२ फेब्रुवारीलाही एटीएम मधून हीच शक्कल लढवून १० हजार रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासून या दोन्ही चोरट्यांवर बीएनएसच्या कलम ३०५(१), ६२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोहकॉ सुरज साबळे, अभिजित, पंकज कुडमेथे, होमगार्ड आकाश टेकाम, पोलिस मित्र विक्की नागतुरे यांनी केली.
Comments
Post a Comment