प्रशांत चंदनखेडे वणी
भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि. ९ मार्चला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा चौपाटीवर घडली. भास्कर जगन जिलठे वय अंदाजे ५० वर्षे रा. मंदर ता. वणी असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मंदर येथे वास्तव्यास असलेले भास्कर जिलठे हे पोस्टमास्टर असून रविवार हा बाजाराचा दिवस असल्याने ते सामान खरेदी करण्यासाठी वणीला आले होते. सामान खरेदी करून गावी परतत असतांना लालगुडा चौपाटी वरून मंदरकडे वळण घेतांना भरधाव ट्रकने त्यांच्या मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. अक्षरशः ट्रकच्या चाकाखाली त्यांचा पाय चिरडल्या गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. वणी शहर व तालुक्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. भरधाव व निष्काळजीपणे वाहने चालविण्याने निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. मालवाहू वाहतुकीची सुसाट वाहनेही अपघातास कारणीभूत ठरू लागली आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर लगाम लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
No comments: