प्रशांत चंदनखेडे वणी
खाजगी कंपनीने सार्वजनिक केलेले शेअर खरेदी करण्यासाठी ५० टक्के सवलतीत नोंदणी (आयपीओ सबस्क्रिप्शन) करून देण्याचे आमिष दाखखून सायबर चोरट्यांनी एका शिक्षकाला तब्बल १३ लाख ६७ हजारांनी गंडविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी एका महिलेसह तीन सायबर चोरट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खाजगी कंपनीने सामान्य गुंतवणूकदारांसाठी सार्वजनिक केलेले शेअर खरेदी करण्याकरिता प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये भाग घेण्यासाठी ५० टक्के सवलतीत नोंदणी (आयपीओ सबस्क्रिप्शन) करून देण्याचा मॅसेज किशोर ओंकारराव चौधरी (४४) रा. गुलमोहर पार्क वणी या शिक्षकाच्या व्हाट्सऍपवर आला. त्यानंतर त्यांच्याशी व्हाट्सऍपवर चॅटिंग करणाऱ्यांनी त्यांना यासाठी प्रायमरी ट्रेडिंग अकाउंट काढण्याकरिता अनथेंटीक कंपनीचे ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षकाने ऍप डाउनलोड करून आयपीओ सबस्क्रिप्शन करून घेतले. नंतर किशोर चौधरी यांनी टप्याटप्प्याने या ऍपच्या माध्यमातून तब्बल १३ लाख ६७ हजार रुपये शेअर बाजारात गुंतविले. त्यांनी वेळोवेळी गुंतविलेली रक्कम ऍपमध्ये दर्शविली जात होती.
तसेच ग्रुप ऍडमिन महिलेने रक्कमेचा वापर करून करावयास सांगितलेल्या ट्रेड्स द्वारे शिक्षकाच्या प्रायमरी अकाउंटमध्ये जवळपास ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपये एवढी रक्कम जमा असल्याचे दिसत होते. मात्र त्यानंतर ग्रुप ऍडमिन महिलेने शिक्षकाला नवीन आलेल्या बालाजी फॉस्फटेसला (balaji phosphates) आयपीओ सबस्क्रिप्शन करण्यास सांगितले. परंतु शिक्षकाने आता एवढे पैसे नसल्याचे कारण सांगून नवीन आयपीओ सब्स्क्रिप्शन करण्यास नकार दिला. शिक्षकाने आयपीओचे पैसे न भरल्यास काय होऊ शकते अशी विचारणा केली असता त्यांनी तुमचे जेवढे पैसे जमा आहेत, तेवढे शेअर तुम्हाला मिळतील असे सांगितले. परंतु ५ मार्चला त्यांच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये ५९ लाख ६५ हजार रुपये आयपीओ अलॉट (IPO ALLOT) झाल्याचा मॅसेज आला. हा मॅसेज पाहून शॉक झालेल्या शिक्षकाने याबाबत गृप ऍडमीन महिलेला सांगितले. मात्र महिलेले काही तरी करू असे सहज उत्तर दिले. त्यानंतर ६ मार्चला शिक्षकाला ग्रुप ऍडमिन कडून आणखी १५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. आणि पैसे न भरल्यास आतापर्यंतची ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपये ही पूर्ण रक्कम कंपनी ब्लॉक करेल, व शिक्षकाची प्राथमिक शेअर मार्केट नोंदणी देखील रद्द केली जाईल, असे सांगण्यात आले.
त्यामुळे किशोर चौधरी यांना या शेअर मार्केट बाबत संशय आल्याने त्यांनी ६ मार्चला सायबर क्राईम पोर्टलवर कॉल करून सर्व घटनाक्रम सांगितला. आणि सर्व पुरावे देखील ऑनलाईन सादर केले. त्याच दिवशी सायंकाळी परत ग्रुप ऍडमिन महिलेचा फोन आला, व त्यांना सर्व शेअर दिल्याचे सांगण्यात आले. मात्र हे शेअर त्यांना १५ लाख रुपये भरल्यानंतरच विक्री करता येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आयपीओ सबस्क्रिप्शनच्या नावाखाली सायबर भामट्यांनी आपली १३ लाख ६७ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे किशोर चौधरी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी १८ फेब्रुवारी ते ६ मार्च पर्यंत घडलेल्या संपूर्ण फसवणुकीच्या घटनाक्रमाची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. किशोर चौधरी यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी ग्रुप ऍडमिन १ महिला, २ अनिल कुमार गोयल आणि ३ कस्टमर एक्झिकेटिव्ह यांच्या विरुद्ध बीएनएसच्या कलम ३१८(४), सहकलम ६६(D) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.
No comments: