प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील निंबाळा गावातील नागरिकांना गावालगतच पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाळीव जनावरे शेतात चराई करीता घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसला. वाघ दिसताच त्याने शेतातील बंड्याकडे धूम ठोकली. वाघाचे दर्शन झाल्याने भयभीत झालेल्या या मुलाने ही माहिती नंतर गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी याबाबत शहानिशा करण्याकरिता शेत शिवारकडे मार्गक्रमण केले. गावकऱ्यांनाही या वाघाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी तात्काळ ही माहिती वन विभागाला दिली. वन अधिकाऱ्यांना वाघ आढळल्याची माहिती मिळताच त्यांनी शीघ्र निंबाळा गावाकडे धाव घेतली. वन अधिकाऱ्यांच्याही दृष्टीसही हा वाघ पडला. हा पट्टेदार वाघ निंबाळा परिसरातच टेहाळणी करीत असून वन विभागाची संपूर्ण टीम निंबाळा येथे तळ ठोकून आहे. वाघाच्या हालचालीवर वन विभाग बारीक लक्ष ठेऊन आहे.
निंबाळा हे गाव झुडपी जंगलाने वेढलेलं आहे. आजूबाजूला घनदाट परिसर असल्याने येथे वन्य जीवांचं वास्तव्य दिसून येतं. गावालगत वन्य जीवांचा संचार असल्याचे अनेकांना अनुभव आले आहेत. त्यातल्यात्यात आता ढाण्या वाघचं परिसरात आल्याने गाववासीयांचे धाबे दणाणले आहेत. शनिवार ८ मार्चला सकाळी जनावरे शेतात चराई करीता घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला शेत शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. समोर वाघ दिसताच त्याची चांगलीच पंढरी घाबरली. त्याने सरळ शेतातील बंड्याकडे धूम ठोकली. शेत शिवारात वाघ असल्याची माहिती त्याने गावकऱ्यांना दिल्यानंतर गावकऱ्यांनी याची खात्री करून घेण्याकरिता शेत शिवाराकडे मार्गक्रमण केले. तेंव्हा त्यांनाही या वाघोबाचे दर्शन झाले. झुबक्या मिशाचा पट्टेदार वाघ डोळ्यासमोर दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीती संचारली. त्यामुळे गावचे सरपंच मनोज ढेंगळे यांनी लगेच ही माहिती वन विभागाला दिली. गावालगत वाघ आढळल्याची माहिती मिळताच वन विभागाचा ताफा घटनास्थळी पोहचला.
वणी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुजाता विरकर, वनरक्षक वाघ हे स्वतः वाघ आढळलेल्या ठिकाणी आपल्या चमूसह दाखल झाले. वनरक्षक वाघांना देखील खऱ्याखुऱ्या वाघाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाचे पगमार्क सुद्धा अधिकारी वर्गाला आढळून आले आहे. वणी व मारेगाव वन विभागाची संपूर्ण टीम निंबाळा परिसरात तळ ठोकून आहे. वाघाच्या हालचालींवर वन विभाग बारीक लक्ष ठेऊन आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागाने वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. गावकऱ्यांचीही प्रचंड गर्दी वाघ आढळलेल्या ठिकाणी उसळली आहे. वाघ तेवढ्याच परिसरात टेहाळणी करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
No comments: