प्रशांत चंदनखेडे वणी
वारकरी संतांनी खरं पाहता मराठीला समृद्ध केलं. संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथात देखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत गेली, असे प्रतिपादन स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. ते श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळात साजरा करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरवदिन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विजया देवाळकर होत्या. तर कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक भगवान ठमके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारमंचावर अनंत बेसेकर, भरत मालेकर, देवेंद्र राजगडकर, रवींद्र गुल्हाने आदी शिक्षक उपस्थित होते.
ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, केवळ मराठीच नव्हे तर कोणत्याच भाषेत शुद्ध किंवा अशुद्ध हा प्रकार नसतो. ती एकतर प्रमाण असते किंवा बोली असते. माकडाचा माणूस झाल्यानंतर कितीतरी काळाने तो बोलायला लागला. मग त्याच्या लाखो वर्षानंतर लिपी आली. म्हणून आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. कालांतराने लिहिणेही सहज होईल.
आपल्या अध्यक्षीय भाषणात विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजया देवाळकर यांनी मराठी भाषेबद्दलची आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, मराठी भाषेला समृद्ध करण्यात कुसुमाग्रजांसह सर्वच मराठी लिहिणाऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. मराठीला समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे. कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक ग्रंथपाल सुरेंद्र विधाते यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिक्षक देवेंद्र राजगडकर यांनी केले.
याप्रसंगी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या प्रतिनिधींनी 'शेतकरी विरोधी कायदे' हे पुस्तक वाचनालयाला भेट दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, लिपिक अमर पेटकर आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
No comments: