Latest News

Latest News
Loading...

दुकानांसमोरील वाहनांचे टायर, बॅटरी व म्युझिक सिस्टीम लंपास करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद

प्रशांत चंदनखेडे वणी 

मोटार मेकॅनिक ऑटो पार्ट्स समोर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाची बॅटरी व म्युझिक सिस्टीम तथा टायर विक्रीच्या दुकानासमोर ठेऊन असलेले ट्रकचे दोन टायर चोरट्याने चोरी केल्याची घटना २ मार्चला रात्री घडली. ३ मार्चला सकाळी दुकाने उघडल्यानंतर ही चोरीची घटना उघडकीस आली. टायर विक्रीच्या दुकानासमोरून टायर चोरीला गेल्याने दुकान मालकाने दुकानाबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात चोरटा टायरची चोरी करतांना आढळून आला. तसेच मोटार मेकॅनिक ऑटो पार्टस समोरील वाहनाची बॅटरी व म्युझिक सिस्टीम चोरी करतांनाही हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला. हा चोरटा चिखलगाव येथीलच रहिवाशी असल्याची ओळख पटल्यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांनी या चोरट्याविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी वाहनाच्या वस्तू व दुकानासमोरील ट्रकचे टायर चोरी करतांना सीसीटीव्हीत कैद झालेल्या अमोल विजय ठाकरे (२५) रा. रामनगर, चिखलगाव या चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

वणी-चिखलगाव मार्गावर रवि मोटार मेकॅनिक ऑटो पार्ट्स व एपी टायर ही व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. रवि मोटार मेकॅनिक ऑटो पार्ट्स येथे दुरुस्ती करीता आलेले पिकअप वाहन दुरुस्तीचे काम बाकी असल्याने रात्री दुकानासमोरच उभे होते. या पिकअप वाहनातील म्युझिक सिस्टीम किंमत ५ हजार रुपये व बॅटरी किंमत १० हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. तर येथीलच एका स्कॉर्पियो वाहनाचा काच फोडून चोरट्याने ५ हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच एपी टायर दुकानासमोर ठेऊन असलेले ४० हजार रुपये किंमतीचे ट्रकचे दोन टायर चोरट्याने लंपास केले. एकाच रात्रीत चोरट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 

सकाळी ही दोन्ही दुकाने उघडल्यानंतर दुकांसमोरील वाहनांच्या वस्तू चोरीला गेल्याचे दुकान मालकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या व्यावसायिकांनी व्यावसायिक प्रतिष्ठानाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात त्यांना वाहनाची बॅटरी व म्युझिक सिस्टीम तथा दुकानासमोरील ट्रकचे टायर चोरी करणारा चोरटा आढळून आला. वाहनांच्या वस्तू व टायर चोरी करणारा चोरटा हा चिखलगाव येथे राहणारा अमोल ठाकरे असल्याची ओळख पटल्यानंतर रवि मोटार मेकॅनिक ऑटो पार्टस येथे काम करणाऱ्या मुकिंद उत्तमराव बावनकर (५१) यांनी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानातील कर्मचाऱ्याच्या तक्रारी वरून अमोल ठाकरे या चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.