Latest News

Latest News
Loading...

पोलिस पाटलावर जीवघेणा हल्ला, शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी  

झरीजामणी तालुक्यातील चिचघाट गावच्या पोलिस पाटलावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉडने केलेला वार पोलिस पाटलाच्या डोक्यावर बसल्याने पोलिस पाटील गंभीर जखमी झाला आहे. पोलिस पाटलावर हल्ला चढविणारा आरोपी हा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे. त्याने निर्दयीपणे पोलिस पाटलाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ३ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास खडकडोह बसस्थानकावर घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिस पाटील पंढरी अरुण डुकरे (३५) हे ३ मार्चला आपल्या भावाच्या शेतात मजुराचा डब्बा पोहचविण्याकरिता जात होते. दरम्यान खडकडोह बसस्थानकावर उभ्या असलेल्या मोरेश्वर परशुराम सरोदे (३८) याने त्यांना विनाकारण अश्लील शिवीगाळ केली. मात्र त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते शेताकडे निघून गेले. परंतु सायंकाळी ७.३० वाजता जेंव्हा पंढरी डुकरे हे दुचाकीने शेतमजुराला खडकडोह येथे सोडायला गेले, तेव्हा बसस्थानकावरच दबा धरून बसून असलेल्या मोरेश्वरने त्यांना बसस्थानकावर अडविले. त्यावेळी त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्याने कसलाही विचार न करता थेट पंढरीवर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. मोरेश्वरने लोखंडी रॉडने केलेला पहिला वार पंढरी डुकरे यांच्या डोक्यावर बसला. तर त्याने केलेला दुसरा वार पंढरी यांनी हुकविल्याने रॉड त्यांच्या मानेवर लागला. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. आज तुझा जीवच घेतो असे म्हणत मोरेश्वर हा क्रूरतेने रॉडचे वार करीत असतांना पंढरी यांनी जिव वाचविण्याकरिता जोरजोरात आरडाओरड केली. त्यामुळे मोरेश्वर याने तेथून पळ काढला. 

मोरेश्वरने ताकदीने पंढरीच्या डोक्यावर रॉड मारल्याने त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. तेवढ्यात त्यांचा भाऊ अविनाश डुकरे हा घटनास्थळी पोहचला. त्यांने पंढरी यांना चारचाकी वाहनातून सरळ मुकुटबन पोलिस स्टेशनला आणले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पंढरी यांना तात्काळ उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अविनाश डुकरे याने मोरेश्वर सरोदे रा. खडकडोह याच्या विरुद्ध पोलिस पाटील पंढरी डुकरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याबाबत मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. अविनाश डुकरे याच्या तक्रारी वरून पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचा तालुकाध्यक्ष मोरेश्वर सरोदे याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(२), २९६, ३५१(२) गुन्हा दाखल केला आहे. सत्ता पक्षातील एका पदाधिकाऱ्याने पोलिस पाटील या महत्वाच्या पदावर असलेल्या युवकावर जीवघेणा हल्ला केल्याने वणी उपविभागात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास मुकुटबन करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.