मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत वाहतो अवैध दारूचा पाट, आणि पोलिस बघतात हप्त्यांची वाट
प्रशांत चंदनखेडे वणी
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीला उधाण आलं आहे. गावागावात अवैध दारू विक्री सुरु असतांना पोलिसांचं मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष होतांना दिसत आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध दारू विक्री सुरु असल्याची जोरदार चर्चा येथील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील बहुतांश गावांमध्ये दारू विक्रीचे अड्डे थाटले असून पोलिसांच्या पाठबळामुळेच बिनधास्त दारू विकली जात आहे. गावात व गावालगत पावलापावलांवर दारू मिळत असल्याने ग्रामीणवर्ग दारूचा प्रचंड तलबी झाला आहे. गावातच मुबलक दारू मिळत असल्याने तरुण पिढीही दारूच्या आहारी जाऊ लागली आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर ठाणेदारांचं कुठलंही नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. केवळ हप्ते गोळा करण्यात पोलिस स्टेशन गुंतलं असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया दारूमुळे संसार उध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या महिलांमधून व्यक्त होतांना दिसत आहेत. मुकुटबन पोलिसांच्या नजरेपासून लपली नसलेली ही अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुकुटबन पोलिस स्टेशनमध्ये आलबेल नसल्याची चर्चा पोलिस वर्तुळातूनच ऐकायला मिळत आहे. आपसी समन्वयाच्या अभावामुळे अवैध धंद्यांवरील कार्यवाहीत पोलिसांची उदासीनता दिसून येत आहे. मुकुटबन पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची गळचेपी केली केली असल्याची कुजबुज कर्मचाऱ्यांमधूनच ऐकायला मिळत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्याकरिता कार्यवाही करण्याची मुभाही पोलिस कर्मचाऱ्यांना दिली जात नसल्याची दबक्या आवाजातील चर्चा ऐकायला मिळत आहे. बिट जमदारांसह पोलिस शिपायांना कार्यवाही करण्याची सूट नसल्याने सत्य परिस्थिती डोळ्यापुढे येऊनही ते कार्यवाही करू शकत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली आहे. ठाणेदारांच्या एकाधिकाशाही गाजविण्याने पोलिस स्टेशन मधील कर्मचारी कमालीचे हैराण झाले आहेत.
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. मारहाणीच्या घटनाही प्रचंड वाढल्या आहेत. अवैध धंदेही चांगलेच फोफावले आहेत. एका दारू तस्कराने दारूची अवैध वाहतूक करतांना घरासमोर खेळणाऱ्या एका चिमुकलीला मोटारसायकलने उडविल्याची घटना नुकतीच मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत घडली. चिमुकलीचा बळी घेणाऱ्या दारू तस्करालाही वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आई वडील व गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांचा हा प्रयत्न विफल ठरला. आणि चिमुकलीला धडक देणाऱ्या आरोपीवर दारू तस्करीचाही गुन्हा पोलिसांना दाखल करावा लागला. हा दारू तस्कर मोटारसायकलने बोपापूरला दारूचा साठा घेऊन जात होता.
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूचा महापूर वाहत असतांना ठाणेदार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बोपापूर, खडकडोह, खातेरा, डोंगरगाव, घोन्सा, अडेगाव, कोसारा यासह इतरही काही गावांमध्ये अवैध दारू विक्री जोरात सुरु असतांना पोलिसांची बेफिक्री पाहायला मिळत आहे. अवैध दारू विक्रेत्यांना खुली सूट देऊन पोलिस हप्त्यांची लयलूट करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणेदारांच्या छुप्या परवानगीने गावागावात सर्रास अवैध दारू विक्री सुरु आहे. पोलिसांच्या मधुर संबंधांमुळे अवैध दारू विक्रेते प्रचंड निर्ढावले आहेत. त्यामुळे ते गावागावात बिनधास्त दारू विक्री करतांना दिसत आहेत. ग्रामीण भागात अवैध दारूचा पाट वाहत असल्याने शेतकरी व मजुरदारवर्ग दारूचा तलबी होऊ लागला आहे. मजुरांची अख्खी मजुरीच दारू पिण्यात खर्च होत असल्याने त्यांच्या सांसारिक जीवनात कलह निर्माण होऊन संसार उध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण संस्कृतीला नशेचं ग्रहण लावणारी ही अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामीण महिलांमधून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment