अचानक आडवं आलं जनावर आणि घडला अपघात, अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
दुचाकीला जनावर आडवं आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवार दि. १६ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा मार्गावरील सागर ढेंगळे यांच्या घराजवळ घडली. राहुल सुरेश धांडे (३०) रा. वांजरी असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
वणी येथील कामे आटपून दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने डाव साधला व नियतीने तरुणाला कायमचे हिरावून घेतले. वणी वरून वांजरीला मोटारसायकलने जात असतांना जनावराच्या रूपात काळ आडवा आला. दुचाकीला अचानक जनावर आडवं आल्याने दुचाकीची जनावराला जोरदार धडक बसली. या अपघातात राहुल धांडे या दुचाकीस्वाराला जबर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल धांडे हा स्वतःच्याच शेतीची कामे करायचा. त्याने शहरातील एका ड्रायव्हिंग स्कुलमध्येही अनेक वर्षे काम केले होते. रविवारी वणीला कामानिमित्त आलेला हा तरुण सायंकाळी दुचाकीने गावी परतत असतांना हा अपघात झाला. आणि या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाच्या शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण केली. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment