घरात सोन्याचा हंडा असल्याचे भासवून घरमालकाला गंडविले, पोलिसांनी तीन ठगांना ठोकल्या बेड्या
प्रशांत चंदनखेडे वणी
कोरपना तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेल्या व्यक्तीच्या घरात गुप्तधन असल्याचा बनाव करून त्याला नागपूर जिल्ह्यातील दोघांनी गंडविल्याची घटना १६ मार्चला उघडकीस आली. घरात दडलेलं गुप्तधन काढून देण्याच्या नावाखाली त्याच्या कडून १ लाख ६५ हजार रुपये रोख व ११ ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस उकळणाऱ्या दोन ठगांसह तिन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ४४ वर्षीय फिर्यादीच्या तक्रारी वरून पोलिसांनी तिनही आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. या तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील रहिवाशी असलेल्या विजय महादेव टोंगे (४४) यांची दोन महिन्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील कवठा येथील रहिवाशी असलेल्या क्रिष्णा कन्हैय्या येदानी (३५) याच्याशी ओळख झाली. क्रिष्णा हा वैद्य असून तो आयुर्वेदिक उपचार करतो. विजय टोंगे यांना कंबरेचा त्रास असल्याने ते क्रिष्णा यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार घेत होते. मात्र विजय यांना क्रिष्णाच्या उपचाराने आराम पडत नव्हता. अशातच क्रिष्णाने विजयला त्यांच्या घरात सोन्याचा हंडा असल्यामुळे त्यांची प्रकृती ठीक राहत नसल्याचे सांगितले. घरात असलेलं गुप्तधन (सोन्याचा हंडा) बाहेर काढलं नाही तर अनर्थ घडू शकतो, अशी भीती वजा लालसा क्रिष्णाने विजय टोंगे यांना दाखविली. घरात सोन्याचा हंडा असल्याचे कळताच विजयचेही डोळे वधारले. विजयला भीती व मोह आवरता आला नाही. त्याने क्रिष्णाला घरातील सोन्याचा हंडा काढण्यास सहमती दर्शविली. विजयची सहमती मिळाल्याने क्रिष्णा ५ मार्चला आपल्या अन्य एका साथीदारासोबत विजयच्या घरी आला. या दोघांनीही विजयला सोन्याचा हंडा काढण्यासाठी पूजाविधी करावा लागेल असे सांगून पूजेच्या सामग्री करीता विजयकडे १ लाख ६५ हजार रुपयांची मागणी केली. विजयने कुठलाही विचार न करता त्यांना रोख रक्कम दिली. त्यानंतर क्रिष्णा येदानी व त्याचा साथीदार जितेंद्र जिवन राठोड रा. आसोला सावंगी जि. नागपूर हे दोघेही तेथून निघून गेले. नंतर पूजेची सर्व सामग्री घेऊन ६ मार्चला दुपारी १.३० वाजता क्रिष्णा व जितेंद्र हे विजयच्या घरी आले. विजयच्या घरी येऊन त्यांनी थातुर मातुर पूजाविधी आटोपला. त्यानंतर विजयला आत बोलावून त्याच्या हातात एक हंडा दिला. हा हंडा उघडू नका, नाही तर अघटित घडेल अशी भीती विजयला दाखविण्यात आली. आणि हंडा त्याला घराच्या आड्याला बांधून ठेवण्यास सांगण्यात आले.
घरात आणखी दोन सोन्याचे हांडे असून ते देखील बाहेर काढायचे आहे, असे या दोघांनी विजयला सांगितले. त्यामुळे विजयची आणखीच उत्सुकता वाढली. मात्र हे दोन सोन्याचे हांडे बाहेर काढण्याकरिता आधी त्याठिकाणी सोने चढवावे लागेल, अशी या दोघांनी विजयला थाप मारली. परंतु भीती वजा उत्साहाच्या भरात विजयने त्यांना ११ ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस देऊन टाकला. क्रिष्णा व जितेंद्रने सोन्याचा नेकलेस घरात खोदलेल्या खड्ड्याला दान केल्याचे भासविले. नंतर ९ मार्चला क्रिष्णाचा विजयला फोन आला व उर्वरित दोन सोन्याचे हांडे बाहेर काढण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागेल आणि त्याकरिता १२ लाख रुपयांचा खर्च येईल, असे त्याला सांगण्यात आले. मात्र एवढा खर्च करण्याची आपली कुवत नसल्याचे विजयने क्रिष्णाला सांगितले. परंतु क्रिष्णाने घरात असलेले दोन सोन्याचे हांडे बाहेर न काढल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्याचे पडसाद भोगावे लागतील अशी भीती दाखविली. त्यामुळे बुचकळ्यात सापडलेल्या विजयने हा सर्व प्रकार आपल्या नातेवाईकाला सांगितला. नातेवाईकाने विजयची संपूर्ण कथा ऐकल्यानंतर त्या दोघांनी त्याची फसवणूक केल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे विजयने घराच्या आड्याला बांधलेला हंडा उघडून पाहिला. त्यात विजयला पितळेच्या मुर्त्या आढळून आल्या. तसेच त्या दोघांनी घरात खोदलेल्या खड्ड्याला दान केलेला सोन्याचा नेकलेसही विजयला आढळून आला नाही.
त्यामुळे विजयला आपली फसवणूक झाल्याचे कळून चुकले. विजयने नंतर क्रिष्णाला फोन करून विधीसाठी लागणारे १२ लाख रुपये देण्याचा विश्वास दर्शवून त्याला भेटायला येण्यास सांगितले. परंतु क्रिष्णाने विजयच्या घरी येण्यास नकार दिला. चंद्रपूर, वरोरा किंवा वणी येथे भेटायला येण्याची त्याने तयारी दर्शविली. १६ मार्चला क्रिष्णा व जितेंद्र इनोव्हा वाहनाने शासकीय आयटीआय जवळील हयात ऍक्वा जवळ आले. तेथे विजय व त्याचे नातेवाईक त्यांना भेटण्याकरिता गेले. विजयने त्यांना तुम्ही माझी फसवणूक केली असे म्हणत माझे पैसे व सोन्याचा नेकलेस मला परत द्या, असे म्हटले. यावर त्यांनी पैसे व नेकलेस परत मिळणार नाही, जे करायचे ते करा, असे उत्तर दिले. त्यामुळे विजय व त्याच्या नातेवाईकांनी क्रिष्णा येदानी, जितेंद्र राठोड व कार चालक सुशिल राजेश द्विवेदी (३६) या तिघांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच त्यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रारही नोंदविली. विजय टोंगे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी क्रिष्णा येदानी, जितेंद्र राठोड व सुशिल द्विवेदी यांना अटक करून त्यांच्यावर बीएनएसच्या कलम ३१८(४), ३५२, ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांच्या जवळून १ लाख ५० हजार रुपये रोख, ११ .३४० ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस किंमत ९० हजार रुपये व इनोव्हा कार (MH ४४ B ००५५) किंमत ७ लाख असा एकूण ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, एपीआय धीरज गुल्हाने यांनी केली.
Comments
Post a Comment