बहीण माहेरी निघून आल्याने भावाची फिल्मस्टाईल दादागिरी, पाच साथीदारांसह जावयाला घरी जाऊन बदडले
प्रशांत चंदनखेडे वणी
चित्रपटातील पात्र युवा पिढीच्या अंगात संचारू लागले आहेत. कुणी हिरोगिरी तर कुणी भाईगिरी करतांना दिसत आहेत. त्यांना सर्वकाही चित्रपटातील कथानकाप्रमाणे वाटू लागले असून पोलिस व कायदा याचा त्यांना विसर पडू लागला आहे. बहीण माहेरी निघून आल्याने भावाने चक्क चित्रपटातील कथानकाप्रमाणे आपल्या साथीदारांसह कारने जावयाच्या घरी येऊन त्याला येथेच्छ बदडले. एवढेच नाही तर त्याला कारमध्ये जबरदस्ती बसवून नेत त्याची फिल्मस्टाईल धुलाई केली. ही चित्रपटात शोभावी अशी घटना वणी तालुक्यातील रासा येथे १७ मार्चला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी युवकाला मारहाण करणाऱ्या त्याच्या साळ्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वणी तालुक्यातील रासा या गावात राहणाऱ्या सुभाष प्रकाश शिंदे (३०) याचा विवाह वरोरा येथील रोशनी नामक तरुणीशी झाला. संसारिक जीवन सुरळीत सुरु असतांना १६ मार्चला पती पत्नीत किरकोळ वाद झाला. दोघांमध्ये झालेल्या वादामुळे पत्नी थेट माहेरी निघून गेली. बहीण माहेरी निघून आल्याचे पाहून भावाचा पारा चढला. चित्रपटातील दृश्याप्रमाणे त्याने आपल्या साथीदारांसह जावयाच्या घराकडे मोर्चा वळविला. दोन कारमध्ये सहा ते सात टपोरी मित्र बसवून तो जावयाच्या घरी धडकला. त्यावेळी सुभाषचे वडील व आई गंगुबाई या देखील घरी होत्या. साळा दोन कार व सहा ते सात जणांना सोबत घेऊन घरी आल्याचे पाहून सुभाष व त्याचे आई वडील घराबाहेर आले. साळ्याने व त्याच्या मित्रांनी काही न कळायच्या आताच सुभाषला मारझोड करणे सुरु केले. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून आई मध्यस्थी करायला गेली असता त्यांनी आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण साळा व त्याच्या साथीदारांनी शेजाऱ्यांनाही दम दिला. साळा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क जावयाला मारतच जबरदस्ती कारमध्ये बसविले व त्याची फिल्मस्टाईल धुलाई केली.
सुभाषच्या साळ्याने चक्क जावयाच्या गावात येऊन गुंडगिरी प्रवृत्तीचा परिचय दिल्याने सुभाषचं अख्ख कुटुंबच धास्तीत आलं. सुनेच्या भावाने मुलाला मारहाण करतांनाच मध्यस्थी करणाऱ्या सासूलाही मारहाण करून सुभाषला जबरदस्ती वाहनात बसवून नेल्याने गंगुबाई प्रचंड हादरल्या. त्यांनी सरळ पोलिस स्टेशन गाठून मुलाच्या साळयाविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. गंगुबाई प्रकाश शिंदे (५५) यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी सुभाषचा साळा मोहन केशव कुचनकार (२५) रा. वरोरा व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध बीएनएसच्या कलम 352, 351(3), 351(2), 191(3), 191(2), 190, 189(2), 137(2), 118(1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment