शेजाऱ्यांशी चर्चा करीत असतांना केली मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
शेजारच्या शेतात बैलं जाण्याने नेहमी वाद होत असल्याची शेजाऱ्यांसोबत चर्चा करणाऱ्या व्यक्तीला बाजूलाच उभा असलेल्या युवकाने वाद घालून नाकावर व डोक्यावर बुक्क्याने तथा हातातील लोखंडी कड्याने कपाळावर मारून जखमी केल्याची घटना १७ मार्चला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
वणी तालुक्यातील निंबाळा या गावात राहणाऱ्या प्रकाश मारुती घोरूडे (३४) यांची निंबाळा गावालगत शेती असून त्यांच्या शेताला लागूनच आकाश बंडू कुत्तरमारे यांचं शेत आहे. शेतात बैलं जाण्यावरून त्यांच्यात नेहमी वाद होतात. १६ मार्चला दुपारी २ वाजता प्रकाश घोरुडे यांनी आकाश कुत्तरमारे याला यानंतर माझे बैल तुझ्या शेतात येणार नाही, आणि यावरून आपल्यात आता वादही होणार नाही असे म्हटले. त्यानंतर प्रकाश घोरूडे हे घरी परतले. दुसऱ्या दिवशी १७ मार्चला सकाळी ७ वाजता प्रकाश घोरूडे हे आकाश कुत्तरमारे याच्या शेतात बैलं जाण्याने वाद उत्पन्न होतात अशी शेजाऱ्यांसोबत चर्चा करीत असतांना बाजूलाच उभा असलेला आकाशचा भाऊ सचिन बंडू कुत्तरमारे (३८) हा चिडला. त्याने माझ्या भावालाच चुकीचे का ठरवतो असे म्हणत प्रकाश घोरूडे यांच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर प्रकाशला बुक्क्यांनी मारहाण केली. सचिन हा प्रकाशाला मारहाण करीत असतांना त्याच्या हातातील लोखंडी कडा प्रकाशच्या कपाळाला लागला. त्यामुळे प्रकाशाच्या कपाळातून रक्त वाहू लागले. सचिनने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रकाशने सचिन विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. प्रकाश घोरूडे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी सचिन कुत्तरमारे याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार अविनाश बनकर करीत आहे.
Comments
Post a Comment