मानसिक स्थितीतून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
प्रशांत चंदनखेडे वणी
विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील शास्त्री नगर येथे १८ मार्चला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कौशल्या मनोज साखरकर (३५) असे या गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपासून ही महिला शास्त्री नगर येथे आपल्या माहेरी राहत होती.
आई वडिलांसोबत माहेरी राहत असलेल्या या महिलेने अचानक राहत्या घरीच गळफास घेतला. वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आई नुकतीच लघुशंकेकरिता घरातून बाहेर आली होती. एवढाच एकांत मिळाल्याची संधी साधून या महिलेने घराच्या खोलीत गळफास घेतला. क्षणभरातच आई घरात परतली तेंव्हा तिला कौशल्या ही फासावर झुलताना दिसली. आईने तिला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र वृद्ध आईला ते शक्य होऊ शकले नाही. तिचा गळफास सोडवितांनाच तिचा मृत्यू झाला. महिलेची मानसिक स्थिती ढासळल्याने अघटित काही घडू नये या भीतीपोटी पतीने तिला माहेरी आणून ठेवले होते, असे सांगण्यात येते. परंतु माहेरीही तिने नको तेच केले. खालावलेल्या मानसिक स्थितीतून तिने गळफास लावला. महिलेने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment