ऑटो व दुचाकीची धडक, दुचाकीस्वार व ऑटोतील प्रवासी महिला जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

ऑटो व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक आणि ऑटोतील प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना १९ मार्चला सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ घडली. ऑटोने अचानक वळण घेतल्याने दुचाकी ऑटोला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातात जखमी झालेल्या ऑटोतील प्रवासी महिलेवरही खाजगी रुग्णालयातच उपचार करण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील रहिवाशी असलेला युवक व त्याची पत्नी दुचाकीने वरोरा येथे आपल्या मुलाच्या उपचाराकरिता गेले होते. मुलाचा उपचार करून पती, पत्नी दुचाकीने गावी परतत असतांना वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ अचानक वळण घेणाऱ्या ऑटोला दुचाकी धडकली. त्यामुळे दुचाकी वरील तिघेही जण रोडवर पडले. यात दुचाकी चालकाच्या हाताला जबर मार लागल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच या अपघातात ऑटोतील एक प्रवासी महिलाही जखमी झाली आहे. मुख्य मार्गावरून ऑटोने अचानक वळण घेतल्याने वरोरा वरून वणीकडे येणारी दुचाकी ऑटोवर आदळली. ऑटो चालकाने अचानक ऑटो विरुद्ध दिशेने वळविल्याने दुचाकी चालकाला दुचाकीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे दुचाकी ऑटोला धडकली. या अपघातात दुचाकी चालक व ऑटोतील प्रवासी महिला जखमी झाली आहे. दुचाकी ऑटोवर आदळल्यानंतर दुचाकी चालकासह दुचाकीवरील महिला व लहान मुलगाही रोडवर पडले. मात्र सुदैवाने हा प्रसंग कुणाच्याही जीवावर बेतला नाही.

मागील काही दिवसांत ऑटोच्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑटो चालकांचे भरधाव व निष्काळजीपणे ऑटो चालविणे प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे ऑटोचे कागदपत्र व ऑटो चालकांचा परवाना तपासण्याची मोहीम वाहतूक शाखेने सुरु केली आहे. ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा जात प्रवासी भरले जातात. प्रवासी मिळावे म्हणून ऑटो चालकांची स्पर्धा लागलेली असते. प्रवासाचं अंतर झटपट पूर्ण करून नवीन प्रवासी मिळविण्याच्या नादात सुसाट व बेजाबदारपणे ऑटो चालविले जातात. त्यामुळे ऑटोचे अपघात वाढले आहेत. सावर्ला गावाजवळ ऑटोने अचानक वळण घेतल्याने दुचाकी ऑटोवर आदळली. या अपघातात लहान मुलावर उपचार करून गावी परतणारे पती पत्नी दुर्दैवी प्रसंग ओढवण्यापासून थोडक्यात बचावले.

 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी