शिरपूर ते आबई फाटा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत, रस्त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त न काढल्यास तिव्र आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी
यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या शिरपूर ते आबई फाटा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करणे अतिशय जिकरीचे झाले आहे. या रस्त्यावरून वाहने चालवितांना वाहनधारकांना तारेवरची कसरत कारवी लागत आहे. जवळपास तीन दशकांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. ६० ते ७० गावांतील नागरिक या रस्त्याने मार्गक्रमण करतात. परंतु रस्त्याची झालेली दुरावस्था बघता त्यांचं या रस्त्याने मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. त्यामुळे कायम दुर्लक्ष करण्यात आलेल्या या रस्त्यावर दृष्टिक्षेप टाकून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
दोन जिल्हांना जोडणारा हा ४ किमीचा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला आहे. शिरपूर ते आबई फाटा हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून कोळशाचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. ६० ते ७० गावातील नागरिकांचा प्रमुख मार्गक्रमणाचा हा रस्ता आहे. विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याने शाळा कॉलेजमध्ये जावे लागते. शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरिता शहरी जाण्याचा हा दैनंदिन प्रवासाचा मार्ग आहे. परंतु या रस्त्याच्या विकासाला सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षितपणा भोवला आहे. बांधकाम विभाग या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे सौजन्य दाखवायला तयार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे जवळपास तीन दशकांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता जागोजागी उखडल्याने रस्त्यावरील धूळ मातीमुळे प्रदूषणात वाढ झाली. दिवसरात्र या रस्त्याने कोळशाची वाहतूक सुरु असते. वाहनांच्या सतत जाणे येणे करण्याने या रस्त्यावर नेहमी धूळ उडत असते. या धुळीमुळे शेत पिकांचेही अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने डोळेझाक न करता या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शिरपूर ते आबई फाटा या ४ किमी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग शोधतांना नागरिकांची चांगलीच कसरत होतांना दिसत आहे. खड्डे चुकवितांना वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. हा रास्ता नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. चारगाव चौकी ते आबई फाटा हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक ३१७ व आबई फाटा ते कोरपना मार्ग राज्य महामार्ग क्रमांक ३७४ मध्ये वर्गीकृत करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाचा विकास होणे अपेक्षित असतांना बांधकाम विभागाचा दुर्लक्षितपणा या मार्गाच्या विकासाला नडला आहे.
शिरपूर ते आबई फाटा हा रस्ता आपल्या नशिबाला कोसत आहे. तीन दशकांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचा मुहूर्तच निघाला नाही. हा रस्ता दुरुस्तीकरणाची वाट बघत आहे. या रस्त्याच्या पूर्णतः चिंधड्या झाल्या आहेत. त्यामुळे नाविन्यात नटण्याचं भाग्य या रस्त्याला केंव्हा लाभेल, याची आस या रस्त्याला लागली आहे. तेंव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दयनीय अवस्था दूर करावी व या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाला प्राधान्य द्यावे अशी मागणी शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सा.बा. विभागाचे उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ही मागणी गांभीर्याने न घेतल्यास आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, विधानसभा संघटक सुनिल कातकडे, भगवान मोहिते, प्रकाश कऱ्हाड, प्रविण खानझोडे, राजेंद्र इद्दे, सतिश बडघरे, संतोष कुचनकर, अजय चन्ने, स्वप्नील ताजने, राजू तुराणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment