प्रशांत चंदनखेडे वणी
नागरी वस्तीलगत असलेल्या रेल्वेच्या मालधक्यांवरून कोळशाची प्रचंड धूळ उडत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. प्रदूषित वातावरणात श्वास घेणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. रेल्वेचे मालधक्के काळी धूळ ओकू लागल्याने येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. धूळ प्रदूषणामुळे येथील नागरिक विविध आजारांना बळी पडू लागले आहेत. प्रदूषण नियंत्रण यंत्रणाही कुचकामी ठरताना दिसत आहे. रेल्वे सायडिंग वरून उडणारी काळी धूळ नागरिकांचा काळ ठरू लागली आहे. कोळसा सायडिंग वरून उडणाऱ्या या काळ्या धुळीमुळे परिसरासह येथील नागरिकांचं जीवनही काळवंडलं आहे. धूळ प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या या कोळसा सायडिंग नागरी वस्तीपासून दूर हलविण्याची जीवतोड मागणी होत असतांनाही शासन, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. नागरिकांचं आयुष्यमान घटविणाऱ्या या कोळसा सायडिंग येथून हटविण्याच्या हालचाली सुरु न केल्यास येथील नागरिक तिव्र आंदोलन उभारण्याच्या पवित्र्यात आहेत.
अगदीच रहिवाशी वस्त्यांना लागून रेल्वेच्या दोन कोळसा सायडिंग आहेत. एक सायडिंग वेकोलिला देण्यात आली. तर दुसरी कोल वॉशरीला देण्यात आली आहे. या दोन्ही सायडिंगवर कोळशाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून हा कोळसा मालवाहू रेल्वेने विद्युत प्रकल्पांना पाठविला जातो. या दोन्ही सायडिंगवर दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरु असते. मालवाहू वाहनांच्या सतत जाणे येणे करण्याने कोळसा सायडिंग वरून सारखी धूळ उडत असते. एवढेच नाही मालवाहू रेल्वेत मशीनने कोळसा भरतांनाही मोठ्या प्रमाणात धुळीचा आगडोंब उसळतो. ही धूळ नंतर वाऱ्याच्या वेगाने आसपासच्या परिसरात पसरते. त्यामुळे नागरिकांच्या घरात धुळीचे थर जमा झालेले पाहायला मिळतात. छत, आवार व पोर्चमध्ये काळं आच्छादन पसरलेलं दिसतं. महिलांना दिवसातून कित्येक वेळा घर स्वच्छ करावं लागतं. झाडं, वेली, परिसर पूर्ण काळवंडलेला दिसतो. काळ्या धुळीच्या साम्राज्यात वास्तव्य करणारी जनता कुणासमोर आपली व्यथा मांडावी म्हणून निमूटपणे सगळं काही सहन करत आहे. त्वचेच्या आजारासह अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले रहिवाशी दुबळ्या लोकप्रतिनिधी व अकार्यक्षम राजकारण्यांमुळे अनेक वर्षांपासून यातना भोगत आहेत. अनेक वर्षांपासून धूळ प्रदूषणाच्या समस्येशी झुंजणाऱ्या नागरिकांची ही समस्या सोडविण्याकरिता एकाही संधी साधूने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे येथील नागरिकच आता आक्रमण भूमिका घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.
कोळसा सायडिंग वरून कोळशाची धूळ उडू नये याची खबरदारी घेणं सायडिंग व्यवस्थापनाचं काम आहे. पण सायडिंग व्यवस्थापकच कंत्राटदाराशी हितगुज साधत असल्याने सायडिंगवर व्यवस्थित पाण्याचा निचरा होतांना दिसत नाही. वेकोलि दरवर्षी सायडिंगवर पाणी मारण्याचं कंत्राट देते. सायडिंगवर पाण्याची फवारणी करण्याकरिता लाखो रुपयांचा खर्च करते. पण कंत्राटदार मात्र सायडिंग व्यवस्थपकांशी सूत जुळवून प्रामाणिकपणे पाणी मारतांना दिसत नाही. कंत्राटदार सायडिंगवर पाण्याचे किती टँकर मारतात व किती टॅंकरचे बिल काढतात यावर दृष्टिक्षेप टाकणे आता गरजेचे झाले आहे. सायडिंग व्यवस्थापकांना हाताशी धरून टँकरच्या चक्कर वाढविल्या जात असल्याची चर्चा सायडिंग वरील कर्मचाऱ्यांमधूनच ऐकायला मिळते. कंत्राटदाराकडून सायडिंग व्यवस्थापकांचे हित साधल्या जाते. तर व्यवस्थापक कंत्राटदाराची मर्जी राखत असल्याने पाण्याच्या टँकरमध्ये कंची मारली जात आहे. सायडिंगवर आवश्यकतेनुसार पाण्याचा निचरा केला जात नसल्याने धूळ उडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
कोल वॉशरीला देण्यात आलेल्या सायडिंग वरून तर धुळीचे लोट निघतांना दिसतात. सायडिंगवर रॅक लोड करतांना प्रचंड धूळ उडते. कोल वॉशरीच्या माध्यमातून विद्युत प्रकल्पांना कोळसा पुरविताना चांगल्या प्रतीचा व धुतलेला कोळसा पुरविणे बंधनकारक असतांना चुरी मिश्रित कोळसा मालवाहू रेल्वेत भरून पाठविला जातो. चुरी मिश्रित कोळसा मालवाहू रेल्वेत भरतांना मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडते. कोल वॉशरीवर नियंत्रण ठेवण्याकरिता काही दिवसांपूर्वी एक समितीही नेमण्यात आली होती. मात्र अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे. एकीकडे भेसळ कोळसा पाठवून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. तर दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असलेल्या धूळ प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाही. सायडिंगवर व्यवस्थित पाण्याचा निचरा करण्याचे सौजन्य देखील कोल वॉशरी प्रशासनाकडून दाखविले जात नाही. काळ्या कोळशातून कोट्यवधींची उलाढाल होत असली तरी प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना होतांना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवनाला काळा शाप ठरलेल्या या कोळसा सायडिंग नागरी वस्ती पासून दूर हटविण्याची मागणी येथील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.



No comments: