वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या दोघा बापलेकाला तिघा बापलेकांनी केली जबर मारहाण
प्रशांत चंदनखेडे वणी
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. मारहाणीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. तिघे बापलेक चुलत भावाशी वाद घालत असतांना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघा बापलेकाला लाकडी काठी व हातातील लोखंडी कड्याने मारून जखमी केल्याची घटना आमलोन येथे १८ मार्चला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. लाकडी काठी डोक्यावर मारल्याने एकाचे डोके फुटले. तर एकाला डोळ्याजवळ हातातील कडे लागल्याने ते जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी बापलेकांवर गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत.
मारहाणीच्या घटनांमध्ये झालेली वाढ बघता पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. पोलिस व कायद्याची भीती न उरल्याने जो तो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. आमलोन येथील रहिवाशी असलेल्या दोन शेतकऱ्यांचा वावराच्या हद्दीवरून वाद सुरु होता. एका शेतकऱ्याने वावरात केलेली नाली दुसऱ्या शेतकऱ्याच्या वावरातील हद्दीत येत असल्याने त्यांचे नालीच्या वादातून १८ मार्चला रात्री कडाक्याचे भांडण झाले. तिघे बापलेक चुलत भावाला शिवीगाळ करीत असल्याचे पाहून शेजारी राहणारे बापलेक मध्यस्थी करण्याकरिता गेले. मात्र मध्यस्थी करणाऱ्या बापलेकांनाच या तिघा बालकांनी लाकडी काठी व हातातील लोखंडी कडे मारून जखमी केले.
आमलोन येथील सुधीर महादेव ताजने यांच्या शेतालगत सुभाष श्यामराव कडुकार यांचं शेत आहे. सुधीर ताजने यांनी शेतात नालीचे खोदकाम केले होते. मात्र ती नाली सुभाष कडुकार यांच्या शेताच्या हद्दीत येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावरून त्यांच्यात तणाव होता. १८ मार्चला शेतातील नाली वरून सुधीर ताजने यांच्यासोबत सुभाष कडुकार व त्यांच्या दोन मुलांनी जोरदार वाद घातला. सुधीर ताजने यांना शिवीगाळ करतांनाच त्यांच्या अंगावर तिघेही बापलेक चालून आले. चुलत भावाला शिवीगाळ होत असल्याचे पाहून राहुल जगन्नाथ ताजने हा मध्यस्थी करण्याकरिता गेला. मात्र या बापलेकांनी त्यालाच लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. लाकडी काठी राहुलच्या डोक्यावर मारून त्याचे डोके फोडण्यात आले.
मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडील मध्यस्थी करण्यास आले असता वडिलांनाही मारहाण करण्यात आली. हातातील लोखंडी कडे वडिलांच्या डोळ्याखाली मारण्यात आल्याने ते चक्कर येऊन खाली पडले. कडुकार पिता पुत्रांच्या मारहाणीत राहुल ताजने व त्याचे वडील जगन्नाथ ताजने गंभीर जखमी झाले. त्यामुळे झालेल्या मारहाणी बाबत राहुल ताजने याने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी सुभाष श्यामराव कडुकार, रोशन सुभाष कडुकार, गणेश सुभाष कडुकार यांच्यावर बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment