छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ समता व सद्भावनेचा होता : किरण देरकर
प्रशांत चंदनखेडे वणी
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे. १८ पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी साम्राज्य उभारलं होतं. स्वराज्याची सर्वप्रथम संकल्पना मांडणारे शिवाजी महाराज रयतेचं जीवापाड रक्षण करायचे. शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा समभाव व सद्भावनेचा होता. परंतु संत व महापुरुषांच्या विचारधारेच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जातीय राजकारण खेळलं जात आहे. जातीयतेची बिजं रोवून त्याला खतपाणी घालण्याचं काम मागील काही वर्षात पूर्वनियोजित सुरु आहे. शिक्षणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. संप्रदायिकता वाढू लागली आहे. गोडी गुलाबीनं राहणारी जनता द्वेषभावनेने पेटू लागली आहे. जातीय सलोखा असणाऱ्या देशात जातीय विष पेरण्याचं काम केलं जात आहे. बेरोजगारी वाढली आहे. महिला, मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये तर दिले जाते. पण त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जात नाही. आता तर २१०० रुपये देण्याऐवजी महिलांच्या अर्जाची छाटणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा अजून कोरा झाला नाही. कर्ज माफीचा सरकारला विसर पडला आहे, असे परखड विचार सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांनी व्यक्त केले. त्या राजूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे, माजी सरपंच तथा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन राजूरच्या अध्यक्षा प्रणिता मोहम्मद असलम, ग्रा.प . सदस्य अमर तितरे, ओम चिमुरकर, बबिता सिंह, रेहाना सिद्दीकी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन दिशा फुलझेले यांनी केले. यावेळी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच कर्तृत्ववान व कर्तबगार मुलींचा या कार्यक्रमात किरण देरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये पंचायत समितीत कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्त झालेल्या कु. योगिनी सावळे, उत्तम नर्तिका कु. जिया पाटील, लावण्या पुनवटकर या मुलींचा समावेश आहे. दरम्यान भव्य सह भोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक अमृत फुलझेले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment