प्रशांत चंदनखेडे वणी
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पोलिसांकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याने पोलिस रेती चोरट्यांकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. पोलिसांच्या छुप्या पाठबळामुळे रेती तस्करांना रान मोकळे झाले आहे. पोलिसांनी मधुर संबंधाचा काळा चष्मा डोळ्यावर चढविल्याने वाळू चोरीचे ट्रॅक्टर त्यांच्या दृष्टीस पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र एसडीपीओ कार्यालयीन पोलिस पथकाने मागील एक महिन्यात मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत तीन वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर पकडले. तर महसूल विभागानेही मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत नुकतीच एका वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. यावरून वाळू चोरटे मुकुटबन पोलिसांचे हित जोपासत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. वरकमाईच्या हव्यासापोटी पोलिसच रेती चोरट्यांना चालना देत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. पोलिसांच्या कर्तव्य विपरीत कार्यप्रणालीमुळे रेती तस्करांच्या हिंमती वाढू लागल्या आहेत. बेकायदेशीर रेतीचा उपसा होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोरट्यांच्या घशात जाऊ लागला आहे. याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
रेती तस्करांची पाळे मुळे येथे खोलवर रुजली आहेत. रेती तस्कर कधी शिरजोर होऊन तर कधी अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करी करीत आहेत. रेती घाटांवरून सर्रास रेतीचा उपसा व रेतीची अवैध वाहतूक सुरु असतांना पोलिस व महसूल विभागाचं याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होतांना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिक व घरकुल धारकांना रेती मिळत नाही तर काळ्या बाजारात रेतीचा महापूर वाहत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच दावणीला बांधले गेले असल्याने रेती तस्करी रोखणार तरी कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती तस्करांवर कार्यवाही करणारेच मुकदर्शक बनल्याने तस्कर प्रचंड निर्ढावले आहेत. तस्करांचे बेधडक रात्रीचे खेळ सुरु आहेत. मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतुन मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. मध्यरात्री रेती घाटांवरून बिनधास्त रेती भरलेली वाहने निघतात. रेती चोरी करणाऱ्या वाहनांचा ताफा रात्री रस्त्याने पाहायला मिळतो. रेती चोरीच्या वाहनांनी रात्री रस्ते गजबजलेले दिसतात. मात्र रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना ही वाहने दिसू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका आणखी काय असू शकते.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या शोधात रात्री मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालणाऱ्या एसडीपीओ कार्यालयीन पोलिस पथकाला रेती चोरी करणारे ट्रॅक्टर गवसले. मग मुकुटबन पोलिसांना रेती चोरी करणारे ट्रॅक्टर का दिसत नाही, याचेच नवल वाटते. एसडीपीओ कार्यालयीन पोलिस पथकाने १७ फेब्रुवारीला रात्री १०.१५ वाजता तेजापूर- आमलोन रस्त्याने भरधाव चोरीची रेती वाहून नेणारे ट्रॅक्टर पाठलाग करून पकडले. रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन रेती चोरी करणाऱ्या स्वप्नील रामचंद्र मालेकर याच्यावर एसडीपीओ पथकाने गुन्हा दाखल केला होता. या कार्यवाहीत पोलिस पथकाने रेतीसह ट्रॅक्टर असा एकूण ७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
त्यानंतर २ मार्चला मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतच गस्त घालतांना एसडीपीओ पथकाला पहाटे ६ वाजता सुकणेगाव मार्गावर दोन रेती भरलेले ट्रॅक्टर आढळले होते. पथकाने दोन्ही ट्रॅक्टरला थांबवून चालकांना रेती वाहतुकीच्या परवाण्याबाबत विचारणा केली असता त्या दोघांचीही बोबडी वळली. त्यामुळे पथकाला हे दोन्ही ट्रॅक्टर चोरीची रेती वाहून नेत असल्याची खात्री पटली. पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन माणिक बलकी व कपिल कुत्तरमारे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या कार्यवाहीत एसडीपीओ पथकाने दोन ट्रॅक्टर व रेती असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर चार ते पाच दिवसांपूर्वी महसूल विभागानेही मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतच एका रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. यावरून मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत रेती तस्करी प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामुळे तस्करांना रान मोकळे झाले आहे.

No comments: